अश्लील चित्रफीत प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन एका महिलेला आठ लाखांनी लुबाडले.

अश्लील चित्रफीत प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन एका महिलेला आठ लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार आर. गवडी रा. मांचेरीयल, आदिलाबाद (तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. 


पीडित ३६ वर्षीय फिर्यादी ही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. जुलै २०१७ मध्ये फेसबुकवरून तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना स्वत:चे मोबाईल क्रमांक दिले. व्हॉट्स अ‍ॅपवरून संवाद सुरू झाला. कालांतराने त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्यानंतर काही दिवसांनी ती उपचाराकरिता हैदराबादला गेली असता तिची आरोपीशी भेट झाली.

त्यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले व शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीने तिचे अश्लील चलचित्र तयार केले. ती नागपुरात परतताच तिचे अश्लील चलचित्र फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली व तिला प्रथम १४ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. बदनामीच्या भीतीने तिने त्याला पैसे दिले. कालांतराने त्याची हिंमत वाढली त्यानंतर वारंवार तिच्याकडून पैसे उकळू लागला.

एक दिवस तो नागपुरात आला व तिच्या घरी थांबला. परतताना तिच्या घरातील दागिने घेऊन गेला. अश्लील चित्रफीत फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याकडून आतापर्यंत ८ लाख रुपये उकळले. त्याचा त्रास असह्य़ झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थोडे नवीन जरा जुने