ओवा खालल्याने हे आजार होतील दूर



पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे.ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो.

पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणा-या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.

ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते.

छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो.

हिवाळ्यात दमा असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. अशावेळी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.

पोटाशी संबंधित समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अ‍ॅसिडीटीपासून सुटका होते.

दातदुखीमध्येही ओवा साहाय्यक आहे. अशा स्थितीत लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे.

डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो.

आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो.

पोटात दुखत असल्यास तेलात ओव्याचे थोडेसे दाणे टाकून गरम करावे. कोमट झाल्यावर या तेलाने पोटाचा हलका मसाज करावा. यामुळे वेदना कमी होतात.

मासिक पाळीतील होणा-या वेदनेपासूनही ओव्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. ओव्याचे चार-पाच दाणे चावून खाल्ल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
थोडे नवीन जरा जुने