एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, धार्मिक विधी उरकून परतत होते....


खालापूर : धार्मिक विधी उरकून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या अंधेरी येथील एकाच कुटुंबातील दोघांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.
अंधेरी, चकाला येथे राहणारे हे कुटुंब धार्मिक विधीसाठी कोंडणपूर येथे गेले होते. धार्मिक विधी आटपून पुणे येथून ओला कार घेऊन मुंबई-अंधेरीला परतत असताना खोपोलीजवळील आडोशी उतारावर मुंबईच्या दिशेने जाणारी कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोखंडी क्रॅश बॅरियरवर जाऊन धडकली. 

ही धडक इतकी जोरदार होती की क्रॅश बॅरियर कारच्या डाव्या बाजूची हेड लाईट फोडून सरळ आत घुसला तो थेट मागच्या सीटपर्यंत पोहोचला. यात कारमध्ये पुढील सीटवर बसलेले मोतीराम मोतीवाले (७०) व मागच्या सीटवर बसलेल्या पत्नी उषा मोतीवाले (६५) यांच्या पोटात हा क्रॅश बॅरियर घुसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा नातू शान (२), नात खुशी (१५) व सून मोहिनी जखमी झाले. चालक किरण गुरसुंड हा आश्चर्यकारकरित्या बचावला.

एक्सप्रेस वे देवदूत यंत्रणा, रोडवेज पेट्रोलिंग, बोरघाट पोलीस टीम, डेल्टा फोर्स, लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणांनी जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह खोपोली पालिका रुग्णालयात आणण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने