तुम्हाला शपथ घ्यायची माहीत नसेल तर, " शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांना विचारा"


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, यात नव्याने सामील झालेले काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी हे शपथ ग्रहण करताना चुकले. शपथविधीचा शिरस्ता मोडून त्यांनी स्वत: लिहून आणलेला मजकूर वाचून दाखवला. 

त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलेच भडकले. त्यानंतर पाडवी यांना नव्याने शपथ ग्रहण करायला भाग पाडण्यात आले. या नाट्यमय प्रकारामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मंत्रीपदाची शपथ घेताना घटनेनुसार ठरलेल्या पद्धतीचा अवलंब केला जातो; परंतु राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी के. सी. पाडवी यांनी मात्र स्वत:च्या वेगळ्या शैलीत शपथेचा मजकूर वाचून दाखवला. या प्रकारामुळे राज्यपालांचा माथा भडकला. 

शपथ कशी घ्यावयाची असते, हे समोर बसलेले शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना विचारा, असे खडेबोलसुद्धा राज्यपालांनी पाडवी यांना सुनावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेकांना स्थान मिळाले आहे. त्यात के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. 

सर्वप्रथम त्यांनी रितसर पद्धतीने शपथ ग्रहण केली. त्यानंतर पाडवी यांनी स्वत: लिहून आणलेली काही वाक्ये वाचून दाखवली. 'येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होत आहे. तसेच माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिले, त्यांच्यापुढेही मी नतमस्तक होतो. 

मी माझ्या मतदारांचा कायम ऋणी राहीन', अशी वाक्ये पाडवी यांनी बोलून दाखवली. त्यामुळे राज्यपाल प्रचंड संतापले. अशा पद्धतीने शपथ ग्रहण करायची नसते. जेवढे लिहून दिले आहे, तेवढेच वाचा. तुम्हाला शपथ घ्यायची माहीत नसेल तर पुढे बसलेले शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांना विचारा, अशा शब्दांत राज्यपालांनी खडेबोल सुनावले. त्यानंतर के. सी. पाडवी यांना नव्याने शपथ घ्यायला लावली.
थोडे नवीन जरा जुने