भुकेपेक्षा जास्त जेवण केल्यास शरीरात काय बदल होईल ?


भुकेपेक्षा अधिक भोजन करणे स्मरणशक्तीसाठी हानिकारक ठरू शकते, असे नुकतेच एका संशोधनात आढळले आहे. संशोधकांच्या मते, जो ज्येष्ठ नागरिक आहारात दररोज 2100 कॅलरींचा समावेश करतो, त्याच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो. 

याउलट कमी कॅलरी असलेला आहार मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यात परिणामकारक ठरतो. अमेरिकन संशोधकांनी 70 ते 89 वयोगटातील अशा 1200 ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास केला, ज्यांना डिमेन्शिया (कमकुवत स्मरणशक्ती) नव्हता. यादरम्यान त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही लक्ष ठेवण्यात आले. 

या लोकांची स्मरणशक्ती चाचणी घेण्यात आली. संशोधनाअंती असे आढळले की, 1200 पैकी 163 ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्तीशी निगडित समस्या आढळल्या. अधिक कॅलरीचे भोजन केल्यानेच स्मरणशक्तीस दुप्पट धोका निर्माण झाला, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला. 

एवढेच नव्हे तर स्मरणशक्ती कमकुवत झाल्याने स्ट्रोक, मधुमेह व खिन्नतेची शक्यता वाढते. अभ्यासात भाग घेणा-या ज्येष्ठ नागरिकांना तीन गटांत विभागण्यात आले. पहिल्या गटास दररोज 600-1500 कॅलरी, दुस-या गटास 1500-2100 कॅलरी आणि तिस-या व अखेरच्या गटास 2100-6000 कॅलरी आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला. 

तिन्ही गटांचा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, दुस-या व तिस-या गटातील नागरिकांपेक्षा पहिल्या गटातील नागरिकांच्या स्मरणशक्तीवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही.
थोडे नवीन जरा जुने