आनंदाची बातमी - नेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांक


मुंबई  : केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार महाराष्ट्राचे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादन २०१७ च्या तुलनेत ९८३१ चौ.कि.मी हून वाढून २०१९ मध्ये १०,८०६ चौ.कि.मी इतके झाले आहे. ही वाढ ९७५ चौ.कि.मी आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या वनाच्छादनात सुद्धा ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे.
देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होतो. २०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

याच अहवालात राज्यातील कांदळवनक्षेत्रात १६.२७ चौ.कि.मी ची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय वन सर्वेक्षण अहवालात २०१४ ते २०१९ या कालावधीत १,४७,८१४ हेक्टर क्षेत्र नव्याने राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पर्यावरण समतोल आणि संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीची दखल या अहवालात घेण्यात आली आहे.

महाराष्ट्राने वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उपयोगात आणलेल्या माहिती तंत्रज्ञान सुविधांचा अहवालात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. माय प्लँट ॲप, महाराष्ट्र हरित सेना, हॅलो फॉरेस्ट १९२६ आणि वनीकरणासाठी विविध घटकांचा सहभाग यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दलची विशेष दखल अहवालात विशेषत्वाने घेण्यात आली आहे.
थोडे नवीन जरा जुने