ही 5 दैनंदिन कामे सावकाश करा, नाहीतर बिघडू शकते आरोग्य..व्यायाम आणि दैनंदिन कामे जर वेळ वाचवण्यासाठी घाईघाईत केली जात असतील तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. याउलट जर ही कामे सावकाशपणे केली तर अधिक फायदेशीर ठरू शकतात. 


वेळेअभावी दैनंदिन कामात धावपळ होणे स्वाभाविक आहे, परंतु आरोग्याकडेच दुर्लक्ष केले पाहिजे, हा याचा अर्थ होत नाही. 

घाईघाईत केलेल्या या कामांमुळे आरोग्याला अनेक कारणांनी नुकसान पोहोचू शकते. कसे ते जाणून घेऊया.

ब्रश करणे -

ज्या लोकांना वेगाने आणि घाईघाईत ब्रश करण्याची सवय असते त्यांचे दात कमजोर होतात आणि हिरड्यांना त्रास होतो. हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. तसेच दातांना सडण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या एनॅमल्सनाही नुकसान पोहोचते. ‘ऑस्ट्रेलियन डेंटल असोसिएशन ओरल हेल्थ कमिटी’च्या प्रमुख पीट ऑलड्रिड म्हणतात, यापासून बचाव करण्यासाठी ब्रश आरामात आणि हळूहळू करावा.

पाणी पिणे -

जे लोक घाईघाईने पाणी पितात, त्यांच्या पोटात पाण्यासोबत हवासुद्धा प्रवेश करते. अशा वेळी मलावरोध होणे किंवा पोट फुगण्याची शक्यता वाढते. तहान भागवण्यासाठी पाणी नेहमी सावकाश प्यावे. तसेच घाईघाईत पाणी प्याल्याने ठसका लागणे आणि पाणी श्वसननलिकेत जाण्याची भीती असते. तज्ज्ञांच्या मते, कधीही तहान लागल्यावर पाणी पिऊ नये. कारण खूप तहान लागल्यावरच व्यक्ती घाईघाईत पाणी पिण्यासाठी प्रेरित होते. पाणी पिण्यात अंतर ठेवून थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी प्यावे.


जेवण -

अमेरिकेचे तज्ज्ञ म्हणतात, आरामात जेवण केल्याने शरीराची फक्त 279 किलोजूल ऊर्जा खर्च होते. याउलट घाईघाईत जेवण केल्याने 837 किलोजूल ऊर्जा नष्ट होते. घाईघाईत जेवण केल्याने पोट भरले असल्याचा संदेश मेंदूला मिळत नाही आणि यामुळे ओव्हरईटिंगचा धोका वाढतो. अन्न चांगल्या रीतीने पचत नाही. त्यामुळे अन्नाचे छोटे-छोटे घास खावे आणि खाद्यपदार्थ चावून खावे. असे केल्याने पचनक्रियेवर अनावश्यक ताण पडणार नाही.


वेटलिफ्टिंग -

वेटलिफ्टिंग कधीही वेगाने करू नये. जे लोक वेट रिपीटेशन (10 सेकंद वजन उचलणे आणि चार सेकंद खाली ठेवणे) आरामात करतात, त्यांच्या स्नायूंना अधिक बळकटी मिळते, असे अमेरिकेच्या एका संशोधनातून समोर आले आहे. जे लोक नियमितपणे केवळ सात सेकंदांतच वेटलिफ्टिंग करतात त्या लोकांच्या तुलनेत 10 सेकंदांत असे करणार्‍या लोकांच्या स्नायूंना दोन महिन्यांच्या आत 50 टक्के बळकटी मिळते. तसेच यामुळे मसल्स इंज्युरीचा धोकाही कमी असतो.


श्वास घेणे -

जर तुम्ही हळूहळू आणि दीर्घ श्वास घेत आहात, तर असे केल्याने नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे तणाव कमी होतो, कारण शरीरातील विषारी पदार्थ श्वासावाटे बाहेर पडतात. तसेच व्यक्ती मानसिकरीत्या अधिक मजबूत आणि एकाग्रचित्त होते. यामुळे शारीरिक कमजोरी किंवा इतर समस्यांपासून सुटका होते. नियमितपणे ब्रीदिंग करावी आणि श्वास आत ओढताना त्यावर लक्ष केंद्रित करावे.
थोडे नवीन जरा जुने