रक्तदाबाचा त्रास होतोय हे कसं ओळखाल, त्यावर काय उपाय कराल ?


काळाबरोबर सगळ्याच गोष्टी बदलत असतात हा निसर्गाचा नियमच आहे. आपल्याला होणारे आजारसुद्धा बदलतात. अनेक नवे आजार येतात, जुने आजार आपले स्वरूप बदलतात. याच गोष्टीचा आढावा घेत आज मी आपल्या वाचक वर्गाशी तरुण वर्गातील वाढता रक्तदाबाचा त्रास या विषयावर चर्चा करणार आहे.

तरुण वयात आपल्याला एखादा आजार झाला आहे हे मान्य करणे अनेकांना फार कठीण जाते. मान्य केलेच तरी त्याबद्दल काहीही उपाय करण्याचे अनेकदा टाळले जाते. पण अशा दुर्लक्ष करण्यामुळे, टाळाटाळीमुळे अनेकदा सहज बरा होऊ शकणारा आजार बळावत जातो. फार पूर्वी रक्तदाबाचा त्रास चुकूनच एखाद्याला व्हायचा. काही काळानंतर परिस्थिती बदलली आणि हा उतार वयातील किंवा पन्नाशीनंतरचा आजार म्हटला जायला लागला. पण आज आपल्याला जगभरात विशी आणि तिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.


निरोगी माणसाचा रक्तदाब १२०/८० असायला हवा. हा वरचा आकडा १२० ला systolic blood pressure आणि खालचा आकडा ८० diastolic blood pressure असे म्हणतात. १२०/८० ते १४०/९०च्या मध्ये कुठेही जर हे आकडे राहत असतील तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हटले जाते.

आज तरुणांमध्ये वयाच्या विशीत आणि तिशीत रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढू लागले आहे. सुरुवातीला अनेकदा ह्या त्रासाची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. म्हणून याला silent killer असेही म्हणतात. पण सतत रक्तदाब जास्त राहिल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे मग पुढे हृदयाचे विकार सुरू होण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये calcium जमा होऊन रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, किडनीवर ताण येऊन किडनीचे आजार सुरू होणे, मेंदूला नीट रक्तप्रवाह न मिळाल्याने लकवा येणे, डायबिटीस होणे, लैंगिक जीवनात कमजोरी किंवा अडथळे येणे, आंधळेपणा येणे, घोरणे, म्हणजे झोपताना श्वास घेण्यात अडथळा येणे असे अनेक आजार दुर्लक्षित रक्तदाबामुळे होऊ शकतात.

रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याची अनेक कारणे आहेत. पण ही जवळजवळ सर्व कारणे बदललेले राहणीमान या महत्त्वाच्या घटकाकडे बोट दाखवताना दिसतात.

आपला रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाय –
> रोजच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश करावा. घरचे सकस जेवण जेवावे.

> आपल्या रोजच्या आहारातून saturated fats ना काढून टाकावे. तळलेल्या, जड पडणा-या पदार्थामध्ये, जंक फूडमध्ये फॅटस मोठय़ा प्रमाणावर असतात. हवाबंद प्लास्टिकमधील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

> दिवसभरातील मिठाच्या वापरावर थोडा आळा ठेवावा. रक्तदाब खूप नसेल तर मीठ पूर्ण बंद करण्याची गरज नाही पण कमी नक्की करावे.

> रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी वजन कमी करणे फार गरजेचे असते. शरीराचा स्थूलपणा जितका वाढत जातो तितकाच हृदयावरचा ताण आणि रक्तदाबाचा त्रास वाढत जातो. तुमच्या डॉक्टरांना विचारून तुमच्या उंची आणि वयाप्रमाणे तुमचे वजन किती असले पाहिजे हे जाणून घ्या.

> दररोज शारीरिक व्यायामासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. रोज कमीत कमी एक तास चालणे, धावणे, नाच करणे, पोहणे, एखादा आवडीचा मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.

> रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी दारू, सिगरेट किंवा इतर कोणत्याही उत्तेजनात्मक ड्रगसचे सेवन बंद किंवा अगदी कमी करावे.

> तसेच मानसिक ताणाचा देखील रक्तदाब वाढवण्यात हातभार असतो; त्यामुळे मानसिक ताण आटोक्यात ठेवा. त्यासाठी प्राणायम, योगा असे वेगवेगळे उपाय करा.

दुय्यम प्रकारचा रक्तदाब हा हॉरमोन्सच्या कमी जास्त पातळीमुळे, किडनीच्या आजारांमुळे, दारू किंवा इतर काही ड्रग्जमुळे सुरू होतो. या प्रकारच्या रक्तदाबासाठी औषधे सुरू करणे महत्त्वाचे असते. तरुणांमध्ये रक्तदाबाचा आजार जितक्या झपाटय़ाने वाढतो आहे तो तितक्याच सहज आटोक्यात आणता येऊ शकतो, गरज आहे ती फक्त सजगपणे जगण्याची.
थोडे नवीन जरा जुने