साई बाबांच्या झेंड्याने घेतला तरुणाचा बळी, सैन्य दलात भरती व्हायची होती इच्छा...


कोपरगाव : साई पालखीतील तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. सोमवारी रात्री ११ वाजता टाकळी शिवारात ही घटना घडली. पालखीतील झेंडा विजेच्या तारेला लागल्याने या तरुणाला शॉक बसला.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे येथून ३० जणांची साई पालखी शिर्डीकडे निघाली होती. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही पालखी पोहोचली. 

जेवण झाल्यानंतर पालखीने रात्री ११ वाजता शिर्डीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी अमोल भगवान कोंढरे (२०) याने आपल्या हातातील झेंडा वरती केला. हा झेंडा वरून जाणाऱ्या विद्युत वाहक तारेला लागल्याने विजेचा शॉक बसून अमोलचा जागीच मृत्यू झाला. 

अमोल हा एनसीसी कॅडेट असल्याने लवकरच भारतीय सैन्य दलात भरती व्हायची त्याची इच्छा होती. घटनेनंतर ग्रामस्थांसह पालखीतील इतर साईभक्तांनी अमोलला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
थोडे नवीन जरा जुने