शरद पवार दिल्लीचे तख्तही बदलवून टाकतील - संजय राऊत


ठाणे : आम्ही राज्यात दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्यासोबत मंचावर बसले आहेत, ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे! शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखवले. आता 'अपना टाइम आया है' शरद पवार यांनी महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ते आता दिल्लीचे तख्त बदलवून टाकतील; तेच दिल्लीतही परिवर्तन घडवतील, असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी रविवारी व्यक्त केला.
कळवा, खारेगाव येथे शरद पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राऊत बोलत होते. शरद पवार हेच महाराष्ट्र विकास आघाडीचे उद्गाते आहेत. शरद पवार हे सर्वांना भावनिक होऊन जाऊ नका, असे सांगतात. मात्र आयुष्य हे भावनेवरच चालले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या खाली भावनांचा उद्रेक झाला नसता तर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारच स्थापन झाले नसते. त्यामुळे हे सरकार भावनेच्या उद्रेकातूनच निर्माण झाले आहे. ज्या दिवशी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली, त्याच दिवशी बदल व्हावा, हे मनात आले होते. त्यातून महाराष्ट्र विकास आघाडीची पायाभरणी झाली होती. 

आज महाराष्ट्र विकास आघाडीतील जे तीन पक्ष आहेत, त्यांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना होती. पण आम्ही गेल्या पाच वर्षांत खूप काही भोगले होते. आता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाहेर पडलो आहोत. महाराष्ट्रातील या परिवर्तनाची नांदी देशभर होणार असून, दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रेही शरद पवार यांच्याच हाती असणार आहेत, असे ते म्हणाले.

शरद पवारांचे आदेश ऐकून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीमुळे ठाण्याला दोन मंत्री मिळाले आहेत. आमचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामासाठी स्थापन झाले आहे. लोकांचे फोन टॅप करायला नाही, असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक करताना राऊत म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड तुम्ही नावाच्या आधी डॉक्टर वगैरे लावू नका. कारण तुम्ही जितेंद्र आहात. 

या देशात दोनच जितेंद्र झाले आहेत. एक सिनेमातील आणि दुसरे तुम्ही! सिनेमातील जितेंद्रप्रमाणेच तुम्हीही राजबिंडे आहात. तुम्ही स्वत:ला आरशात बघा; म्हणून डॉक्टर वगैरे म्हणण्यात काही नाही. तुम्ही पवार आणि जनतेच्या मनातील 'जितेंद्र' आहात.
थोडे नवीन जरा जुने