आपल्याला आजार होण्यामागे असतात 'हि' कारणे...


आनुवंशिकता, पर्यावरण, जीवन जगण्याची पद्धत, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, आरोग्यसेवांची उपलब्धता आदी घटकांवर आरोग्य अवलंबून असते. साहजिकच या घटकांमध्ये दोष निर्माण झाल्यास वा त्यांच्यात विपरीत बदल झाल्यास व्यक्तीला विविध आजार होतात.


 व्यक्तीला वाडवडिलांकडून आनुवंशिक घटकांमुळे काही रोग मिळतात. स्किझोफ्रेनियासारखा मनोविकार, मधुमेह, स्तनांचा कर्करोग, हिमोफिलिया असे हे रोग होत. तंबाखूमुळे तोंडाचा-घशाचा कर्करोग होतो. धूम्रपानामुळे फुप्फुसाचा, तर दारूमुळे यकृताचा कर्करोग होतो. व्यायाम न करण्याने लठ्ठपणा निर्माण होतो. सारखी काळजी करायचा स्वभाव असल्यास उच्च रक्तदाब व हृदयविकार होतात. यावरून जीवन जगण्याच्या सदोष पद्धतीमुळे आजार होतात हे आपल्या ध्यानात येते. गरिबी-अज्ञान-कुपोषण-अनारोग्य यांचे जवळचे नाते आहे. पोषक आहार न मिळाल्यास व्यक्तीला कृशपणा येतो व आहार जास्त झाल्यास लठ्ठपणा येतो.दूषित पाणी पिल्यास हगवण, कॉलरा, विषमज्वर, कावीळ असे रोग होतात. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेचे विकार होतात. प्रदूषित मातीमुळे आकडा कृमीची लागण होते. घर-परिसर स्वच्छ नसेल तर माशा, डास यांची पैदास होऊन विविध रोग संक्रमित होतात. 

अज्ञान व निरक्षरतेमुळे व्यक्ती धोकादायक वर्तन करून एड्सचा बळी होऊ शकते. आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यास रोगांचे निराकरण होत नाही व रोगांच्या साथी पसरतात. लिंगभेद, समाजातील पुरुषी वर्चस्व, सांस्कृतिक घटक, अंधर्शद्धा, शरीराच्या चयापचयातील बिघाड, शरीरातील इंद्रियांमधील रचनात्मक व कार्यात्मक बिघाड यामुळेही काही रोग होतात. काही रोग वाढत्या वयामुळे होतात. आजारांची कारणे अशी विविध असल्याने साहजिकच त्यांचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी विवक्षित उपाययोजना कराव्या लागतात.
थोडे नवीन जरा जुने