हेडफोन लावून गाणे ऐकत असाल तर हे होतील गंभीर परिणाम



आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला जसे फायदे दिले आहेत, तशाच काही वाईट गोष्टीही आपोआप मिळाल्या आहेत. अलिकडे सतत मोबाईलवर किंवा आयपॉडवर गाणी ऎकण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे निदर्शनास येते. रस्त्यावर बाहेर कुठेही तुम्ही बघितले तर कित्येकजण कानात हेडफोन लावून गाणी ऎकत असतात नाहीतर, बोलत असतात. आता फटका आता तरूणांना बसणार आहे. कारण, मोबाइल किंवा आयपॉड द्वारे गाणे ऎकणा-या तरूणांची श्रवणशक्ती धोक्यात आली आहे. कानाला हेडफोन लावून जोरजोरात संगीत ऐकल्याने जगातील एक अब्ज तरुण-तरुणींच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला असल्याचा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीत श्रीमंत देशांमधील सर्वसाधारण १२ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. कानाच्या अत्यंत जवळून कर्णपटलांवर जोरजोरात आदळणाऱ्या संगीत लहरींनी बहिरेपणा येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. स्मार्ट फोन किंवा अन्य उपकरणांचा वापर करून संगीत ऐकणाऱ्या साठ टक्के लोकांना बहिरेपणाचा सामना करावा लागतो; तर सुमारे ४० टक्के लोकांना नाइट क्लब आणि संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपण येते.

याबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे शेली चढ्ढा म्हणाले, “बहुसंख्य तरुण मुलांना जोरदार आवाजात संगीत ऐकायला आवडते. हे ध्वनिप्रदूषण त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम करते आणि त्यांना श्रवणशक्ती गमवावी लागते. साउथ आफ्रिकेत २०१० मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धांच्या वेळी वुवुझेला नावाचे वाद्य स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरण्यात आले होते.

हे वाद्य नऊ सेकंद वाजवल्यास सुमारे १२० डेसिबल्सचा आवाज निर्माण होत होता. या वाद्याचा श्रवणशक्तीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट आपण टाळू शकलो असतो ना? या तरुण मुलांनी लक्षात घ्यायला हवे, की श्रवणशक्ती एकदा गेली की पुन्हा येत नाही.”

ते म्हणाले, “गर्दीच्या वेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणानेही बहिरेपणा येऊ शकतो. हे प्रदूषण ८५ डेसिबल्सपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. इयर प्लग्जसारखे उपकरण वापरायचे असेल, तर आवाज मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, असेही चढ्ढा यांनी स्पष्ट केले.”
थोडे नवीन जरा जुने