जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही


कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची वल्गना सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. तुम्हाला चौकशी करायला कोणी अडवले आहे का? कोणाचीही चौकशी करा, आम्ही घाबरत नाही, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला हाणला. त्याचबरोबर जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, चोरून सत्तेवर आलेल्या या सरकारने कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळलेला नाही. 

या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरूच ठेवणार आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून आम्ही हा आवाज उठवला आहे.

या योजनेमध्ये पीक कर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे, भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. २०१९-२० या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत आहोत.
थोडे नवीन जरा जुने