वर्गात पहिल्या आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले !


पालघर : महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून, जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारने आता राज्यातील शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. वर्गात पहिल्या आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात रान पेटवले, कायम त्यांच्यावर टीका केली. त्या बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर जिल्ह्यातील कासा (वरोती) येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. डहाणू तालुक्यातील कासा येथे कार्यकर्ता मेळावा आणि सभेत ते बोलत होते. 

यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ते या वेळी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. विश्वासघात हा जसा या सरकारच्या स्थापनेचा पाया आहे, तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे. 

नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले, पण सप्टेंबर २०१९ ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करू, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा तर देण्यात आल्या होत्या, मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही, तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली, अशीही टीका फडणवीस यांनी केली.
थोडे नवीन जरा जुने