पाठदुखीने त्रस्त असाल तर जाणून घ्या कारणे, आणि उपाय.


सकाळी उठून बसताच वा सतत कार्यालयात बसून काम करताना पाठ दुखते का? जर हीच समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील. नाही तर ही समस्या दीर्घकाळ तुमची ‘पाठ’ सोडणार नाही. 

तज्ज्ञांच्या मते, पाठदुखीची मुख्य कारणे ओळखून ती दूर करण्याची वा आपल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. नसता ही समस्या कायमस्वरूपी राहू शकते. जाणून घेऊया प्रत्यक्षात असे का होते आणि पीडित आपल्या पातळीवर कोणते उपाय अवलंबून या पीडेपासून मुक्तता मिळवू शकतो.

संगीत ऐका 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण मात्र हे खरे आहे की, विश्रांती व सुगम संगीत पाठदुखीपासून सुटका करू शकते. हा एक शांत उपचार आहे. एका आॅस्ट्रेलियन संशोधनात आढळले की, जे लोक लागोपाठ तीन आठवडे दररोज 25 मिनिटे संगीत ऐकत होते, त्यांची पाठदुखी 40 टक्क्यांनी कमी झाली. संगीतामुळे वेदनेकडे पीडिताचे दुर्लक्ष होते. 

सकाळच्या वेदना 

रात्रीच्या वेळी पाठीत अतिरिक्त फ्लुइड गोळा होतो, जो डिस्कच्या आतमध्ये गळत राहतो. डिस्क प्रत्यक्षात एका प्रकारच्या स्पंजी कुशनसारखी असते, जी पाठीच्या कण्यामध्ये 24 सांध्यांना पृथक करते वा त्यांच्यामध्ये असते. 

अशात व्यक्ती सकाळी उठल्यानंतर झुकते तेव्हा त्या संग्रहित फ्लुइडमुळे पाठीच्या कण्यावर दबाव येऊ लागतो. परिणामी व्यक्तीला वेदना होतात. ‘जे लोक सकाळी एकदम झुकत नाहीत, त्यांना वेदना कमी होतात. सकाळी पलंगावरून जमिनीवर पाय ठेवताना कंबर एकदम वा जास्त झुकणार नाही, याची काळजी घ्यावी.
हीट रॅप्स 

पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी बु्रफेनसारख्या वेदनाशामक औषधांचे सेवन बिलकूल करू नका. न्यू जर्सी मेडिकल स्कूलच्या संशोधकांच्या मते, पाठदुखीने पीडित असलेले जे लोक नियमितरीत्या हीट रॅप्सचा (गरम पट्टी) वापर करतात, त्यांच्या वेदना 25 टक्के कमी होतात. हीट रॅप्समुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि उतींची लवचीकता वाढते. 

घाबरून जाऊ नका 

पाठदुखीने त्रस्त असलेले जे लोक शारीरिक कसरतीपासून दूर राहतात, ते कधीही त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाहीत. अशा वेळी तर स्ट्रेचिंग व्यायाम तर अत्यावश्यक आहे. व्यायाम करताना वेदना झाल्यास घाबरू नका, कारण बरे होताना असे होणे हे सामान्य लक्षण आहे.
थोडे नवीन जरा जुने