वडाच्या झाडाचे 'हे' महत्वपूर्ण फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत!


वडाला अक्षय्य वृक्ष असे म्हणतात. या वृक्षाचा कधीच क्षय होत नाही. ते सतत वाढतच असते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात व वडाच्या झाडाचा विस्तार होतो. 

त्यामुळे त्याचे आयुष्य उदंड असते. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. 

वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग तयार होण्यासाठी व हवेत आर्द्रता व गारवा निर्माण होण्यासाठी होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. 

वटवृक्ष सदैव हिरवागार असतो. त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो. वटवृक्षाच्या मुळाचे लाकूड अधिक बळकट असते. तंबूचे खांब, बैलगाड्यांचे जू व दांडे तयार करण्यासाठी ते उपयोगी असते. खोडाचे लाकूड कठीण असते. त्यापासून अनेक वस्तू बनविल्या जातात. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात, पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. 


चिकापासून चिकट गोंद बनवितात. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात व इतर व्याधींवर उपयुक्त असतो. तळपायाच्या भेगांना याचा लेप लावतात. या वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी असतो. वडाचे बी पौष्टिक व थंडावा देणारे असते. 

वडाच्या पारंबाच्या रस हा केसांसाठी चांगला असतो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात . याची कोवळी पाने शेळ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोगी पडतात.
थोडे नवीन जरा जुने