"ही" उपचारपद्धती वंध्यत्वाच्या समस्येवर ठरेल अत्यंत फायदेशीर.


अलीकडील काळात वेगवान बनलेली जीवनपद्धती, शरीरात वाढत जाणारे फॅट्सचे प्रमाण, वाढता तणाव, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण दिसून येते.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांकडून केले जाणारे समुपदेशन अनेकदा फायदेशीर ठरते.

समजून घ्या कारणे - गतिमान बनलेल्या जीवनपद्धतीमुळे आहारावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. जंक फुड्सचे आहारातील प्रमाण वाढत चालल्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढते आहे. परिणामी वंध्यत्वाची उदाहरणे वाढण्याला ही चुकीची आहारपद्धती कारणीभूतच ठरते.

शहरीकरणातील जीवनपद्धतीमुळे पती व पत्नी दोघांनाही नोकरीसाठी धावपळ करावी लागते. यामुळे नोकरी-व्यवसायातील जबाबदार्‍या, कौटुंबिक जबाबदार्‍या अशा विविध आघाड्यांवर लढताना तणावात वाढ होते. याचाही परिणाम वंध्यत्वावर होतो.

पुरुषांमध्ये मद्यपान व धूम्रपान, गुटखा सेवन यांसारख्या सवयींमुळेही योग्य प्रतीचे वीर्य तयार होऊ शकत नाही.


या सर्व कारणांचा परिणाम पुरुषांमध्ये शुक्राणू तयार न होणे, शुक्राणू नसणे, शुक्राणूंची मंदावलेली हालचाल यासारखी कारणे यासाठी कारणीभूत ठरतात.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे : शरीरात होणारे हार्मोनचे असंतुलन, ट्यूबल ब्लॉक, स्त्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाचे त्रास, एन्डोमेट्रियासिस आदी कारणे वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरतात.

आयुर्वेदिक उपचारपद्धती ठरेल लाभदायक - वंध्यत्वासारख्या समस्येवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपचारपद्धती अस्तित्वात आहेत. मात्र, काही उपचारपद्धती तुलनेने अत्यंत महागड्या ठरतात. आययूआय, आययूएफ यांसारख्या उपचारपद्धतींचा उपचार घेणे हे अनेक सामान्य दांपत्यांना शक्य नसते, अशा रुग्णांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा हे एक वरदानच आहे. या उपचारपद्धतीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आजवर दिलासा मिळाला आहे.

या उपचारपद्धतीत शतावरी, अश्वगंधा, अशोक, सफेद मुसळी, कुमारी आदी वनस्पतींचा उपयोग केला जातो. या औषधी वनस्पती या समस्येवर मात करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. उदाहरणादाखल सांगायचे तर ट्यूबल ब्लॉक नाहीसा करण्यासाठी अँलोपॅथी पद्धतीतील लॅप्रोस्कोपी आवश्यक असते. या केसमध्ये आयुर्वेदिक उपचारांमुळे ही समस्या शस्त्रक्रियेशिवाय सुटू शकते. 

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी अँलोपॅथीत विशेष औषधे नाहीत. याउलट आयुर्वेदात मकरध्वज, अश्वगंधा, शिलाजित यांसारख्या औषधांचा उपयोग उत्तम प्रतीचे वीर्य तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. याशिवाय पुसंवनांसारखे विधीही यासाठी आयुर्वेदात उपलब्ध आहेत. 

यात वडाच्या कोंबांचा उपयोग पुष्य नक्षत्राच्या वेळी केल्याने अपत्यप्राप्ती होऊ शकते. या विधीत अज्ञान असले तर हा विधी असफल होण्याचीही आवश्यकता असते. यामुळे आयुर्वेदिक उपचारपद्धती ही योग्य तज्ज्ञांकडून व्हायला हवी. रसायनासारखे औषधही यात उपयुक्त ठरते. पंचकर्म चिकित्सा ही शरीरातील विविध दोष कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पंचकर्माच्या उपयोगाने जीर्ण आजारांवरही मात करता येते. गर्भाशयाशी निगडित जटिल आजारही पंचकर्म चिकित्सेने बरे होतात.

एकंदरीतच वंध्यत्वाच्या समस्येवरील उपचारपद्धती ही अत्यंत खर्चीक असल्याचा गैरसमज करून न घेता डॉक्टरांकडून योग्य वेळी मिळणारे समुपदेशन आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीबरोबर काही पथ्य पाळणे गरजेचे आहेत. आयुर्वेदिक चिकित्सेतून जटिल समस्यांवरही मात करता येणे शक्य आहे. यामुळे या समस्येचा सामना करणार्‍या दांपत्यांनी आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडून आशावादी राहायला काहीच हरकत नाही.
थोडे नवीन जरा जुने