दुपारी मस्त जेवण झालं की एखादी छोटीशी झोप असते फायदेशीर

दुपारी मस्त जेवण झालं की एखादी छोटीशी डुलकी तरी हवीच. परीक्षा असली, सबमिशन्स असले की अशा डुलक्या तर हटकून येतातच. पण तुम्हाला दुपारी एखादी डुलकी, थोडक्यात वामकुक्षी घ्यायची सवय असेल आणि त्यावर कोणी काही बोलत असेल, तर आता बचावात्मक पवित्रा घेऊ नका. त्यांना ठणकावून सांगा, की दुपारच्या झोपेमुळे स्मृती चांगली राहाते. अमेरिकेतील मॅसेच्युएट विद्यापीठात हे संधोशन झालं आहे. दुपारच्या एका तासाच्या वामकुक्षीमुळे मेंदू तरतरीत राहातो, असं त्यांचं संशोधन आहे. अर्थात, या संशोधनात एक ट्विस्ट आहे. त्यांनी हे संशोधन लहान मुलांच्या बाबतीत केलं होतं. त्यामुळे आपलं फारसं काही बिघडत नाही. जी गोष्ट लहान मुलांना लागू होते, ती मोठ्यांना होत नाही, असा काही नियम नाही. तर, या मंडळींनी ४० मुलांचा अभ्यास केला.

दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेणार्या मुलांनी त्यांना दिलेला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण केला, असं यातून दिसून आलं. मग त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत १४ मुलांचा अधिक बारकाईनं अभ्यास केला. झोपेतही मेंदूचं काम सुरू असतं आणि दुपारी डुलकी घेणार्या मुलांच्या शिकण्याच्या व सूचना ग्रहण करणार्या भागाचं कार्य अधिक चांगलं होतं, हेही या प्रयोगातून सिद्ध झालं.

आता मोठ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट. या संशोधनाविषयी डॉ. रॉबर्ड स्कॉट हे बालरोगतज्ज्ञ म्हणतात, ’दुपारच्या डुलकीमुळे ज्येष्ठ नागरिकांची स्मृती तल्लख राहाते, हे माहीत होतं. लहान मुलांच्या बाबत तसं निश्चितपणे सांगता येत नव्हतं. या संशोधनामुळे आता ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या झोपेबद्दल पालकही जागरुक राहातील.’ थोडक्यात काय, तर दुपारची डुलकी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सार्यांनाच लाभदायक असते.
थोडे नवीन जरा जुने