.तर पंकजांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरू पाणी योजना रद्द केल्यास मोठे आंदोलन - फडणवीस


औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी पंकजा मुंडे यांचे लाक्षणिक उपोषण आहे. मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ ठरावा यासाठी आमच्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या. परंतु आताच्या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत मराठवाड्यातील पाण्याच्या योजना रद्द केल्यास आम्ही सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिल्ली गेट येथे भाजपतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मराठवाड्यात सिंचन नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. १५ वर्षे आघाडी सरकार होते, तेव्हा मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले नाही. स्व. गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते, त्यावेळी आश्वासन दिले, मात्र पाणी मराठवाड्याला न देता पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात आले. 

आम्ही पाच वर्षांच्या काळात पाण्यासाठी न्यायालयात लढा दिला. जल परिषदेच्या बैठका झाल्या नव्हत्या त्या घेतल्या. पाच वर्षांत जलयुक्त शिवारातून मराठवाड्यात पाणीक्रांती घडवून आणली. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना बंद करू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी राज्य सरकारला केले. 

कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणायचे आणि मराठवाड्यातील दुष्काळ दूर करायचा आमचा विचार होता. वॉटर ग्रीडमुळे अनेक जिल्ह्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु ते कामदेखील या सरकारने स्थगित केलेले आहे. टेंडर देण्यावरून वाद आहे, यांना टेंडरमध्ये इंटरेस्ट आहे. टेंडर कोणालाही द्या मात्र काम सुरू करा, अशी आमची मागणी असल्याचा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला.
थोडे नवीन जरा जुने