आजारापासून लांब राहायचं असेल तर काय करायला हवं?


 थंडीचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. या साथीच्या आजारापासून लांब राहायचं असेल तर काय करायला हवं?

पावसाबरोबर येणा-या आजारांना नागरिकांनी विसरता कामा नये. पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. नवी मुंबईत झालेल्या एका पाहणीत गेल्या दोन आठवडयांत पोटाच्या विकारांमध्ये २५% वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे. पोटांचे आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव मार्ग आहे, असे मत वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे जठरविकार तज्ज्ञ डॉ. अमित घरत यांनी व्यक्त केले आहे.

पावसाळ्यातील पोटांच्या आजारांविषयी व आहाराविषयी अधिक माहिती देताना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोट व जठर विकार तज्ज्ञ) डॉ. अमित घरत म्हणाले, ‘‘पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटिस, भेलपुरी हे पदार्थ लोकांच्या अतिशय आवडीचे असतात, परंतु पावसाळ्यात हवेत आद्रता जास्त असल्याने यात वापरात येणारे कोथिंबीर, दही, कांदा व बटाटे असे पदार्थ फार लवकर खराब होऊन त्यावर बुरशी किंवा अमिबा असे सूक्ष्म जीव-जीवाणू वाढीस लागण्याची शक्यता असते. रस्त्यावरचे खाल्ले जाणारे चायनीज पदार्थ व उघडय़ावरचे चाट प्रकारचे पदार्थ पावसाळ्यात खाल्ल्याने मळमळल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, मायग्रेन्स, तोंडाची जळजळ, उलटय़ा, पोटदुखी, अतिसार, कावीळ, अमिबायसिस व पोटदुखी अशा समस्यांत वाढ होते.’’

पावसाळ्यातील जंक फूड व रस्त्यावरचे पदार्थ खाण्यामुळे होणा-या आजाराविषयी अधिक माहिती देताना नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा सह्याद्री हॉस्पिटलचे फिजिशियन व आयसीयू विभागाचे तज्ज्ञ डॉ. भरत अग्रवाल म्हणाले, ‘‘पावसाळ्यातल्या कुंद ओलसर हवेनं वातावरणात जडपणा येतो.

वातावरणातला हा जडपणा आपल्या शरीरातही येतो. अशावेळी गुणधर्मानी जड असा आहार घेतल्यास, या दिवसांत हमखास पोट बिघडते. पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमजोर झालेली असते व अशामध्ये बेसनाने बनलेल्या भज्या अथवा अन्य तळलेले पदार्थ पचनशक्तीवर प्रचंड ताण आणतात.

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे. पावसाळ्यात संसर्गाना प्रतिबंध करणा-या चिंच, मेथी, लसून, कांदा अशा पदार्थाचे सेवन करावे.’’ खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ आजारांपासून लांब ठेवण्यास तुम्हाला मदत करू शकतील, असा वैद्यकीय सल्ला डॉ. भरत अग्रवाल यांनी दिला.
थोडे नवीन जरा जुने