जाणून घ्या.. तरुण पिढीला अकाली म्हातारपण का येतंय?स्मरणशक्तीचा अभाव, एखादी गोष्ट लवकर विसरणे, हृदयविकार, नैराश्य, पार्किन्सन हे वृद्धापकाळात होणारे आजार असा सर्वसाधारण समज, पण आता ऐन तारुण्यात वृद्धापकाळात होणारे आजार होत आहेत. वाढत्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुण पिढी स्वत:ला या स्पर्धेत झोकून देत आहे. 


परिणामी ते आहार, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासोबत सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा तणाव, यशस्वी होण्याचा दबाव त्याच्यावर असतो. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे संशोधकांनी केलेल्या विविध प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. 

आधुनिक जीवनशैली आणि त्याच्या परिणामावर झालेल्या विविध अभ्यासातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की तरुण पिढी अकाली प्रौढ होत आहे. आरोग्यदायी जीवनपद्धती अवलंबल्यास असे आजार टाळता येतील, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

1. स्मरणशक्ती कमी होणे इंग्लंडमधील यूएलसीए लॉन्ग्विटी केंद्राने जवळपास 18 हजार 500 पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या जीवनशैलीविषयी प्रश्न विचारले. यामध्ये तरुण, मध्यमवर्गीय आणि वृद्धांचा समावेश होता. जीवनशैलीचा स्मरणशक्तीवर होणारा परिणाम तपासणे हा या पाहणीचा उद्देश होता. 

यात 18 ते 39 वयोगटातील लोकांचे असे म्हणणे होते की त्यांची स्मरणशक्ती अतिशय कमी झाली आहे. अनेक गोष्टी त्यांना आठवत नाहीत. याशिवाय जपानमधील होकाइडो विद्यापीठाच्या एका संशोधनात सुद्धा एक गोष्ट समोर आली की, स्मरणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण तणाव आणि अनेक कामे हे आहे. तरुण पिढीचा बहुतांश वेळ संगणकासमोर टायपिंग करण्यात जातो. 

यामुळे युवकांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे. याचा परिणाम त्यांच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर होतो. परिणामी त्यांना अनेक गोष्टी आठवत नाही असा दावा या संशोधकांनी केला आहे. यूसीएलए लॉन्ग्विटी केंद्राचे संचालक आणि संशोधक डॉ. गॅरी स्मॉलच्या मते, लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ही समस्या वाढत आहे. ही समस्या टाळण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.


हृदयविकार अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या एका संशोधनानुसार तरुणांमधील वाढता तणाव आणि दारूचे व्यसन हृदयाला अशक्त बनवते. दारूच्या व्यसनाचा परिणाम हृदयातील रक्त पुरवठा नियंत्रणात ठेवणार्‍या पेशींवर पडतो. 

अमेरिकेत ही समस्या सर्वात जास्त आहे. कारण येथील 18 ते 25 वयोगटातील बहुतांश युवकांना दारूचे व्यसन आहे. व्यसनासोबत जास्त तणाव त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. तणाव घेतल्याने फक्त हृदयगती वाढत नाही तर हायपरटेन्शनचा त्रास होऊ लागतो. अशाने हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते.


मधुमेह अमेरिकन डायबिटीज असोसिएशननुसार युवा पिढीत मधुमेह वेगाने वाढत आहे. फक्त युरोपात सहा कोटी नागरिकांना मधुमेहाचा त्रास आहे. यातील बहुतांश रुग्ण हे पंचविशीच्या आतील आहेत. अहितकारक जीवनशैलीमुळे जगभरातील युवक टाइप टू मधुमेहाचे बळी ठरत आहेत. 

याची लक्षणे 20 ते 30 वर्षे वय असताना दिसू लागतात. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाला पाहून याला महामारी म्हणून पाहिले जात आहे. संशोधकानुसार मधुमेहामुळे भविष्यात कार्डियोव्हेस्क्युलर समस्या, दृष्टिदोष, मूत्रपिंड निकामी सारख्या त्रासाचा सामना करावा लागतो. 

बदलता आहार आणि शारीरिक कसरतीचा अभाव हे तरुणपणी मधुमेह होण्याची मुख्य कारणे आहेत. आहारात पौष्टिक तत्त्वाचा अभाव आणि जंकफूडचे वाढते प्रमाण यामुळे ही समस्या वाढत आहे.


पार्किन्सन (कंपवात) बंगळुरूमधील पार्किन्सन अँड एजिंग रिसर्च फाउंडेशनच्या मते तरुणपणीच अनेकांना अशा प्रकारचा आजार होत आहे. काही दिवसांपूर्वी एका नऊ वर्षांच्या मुलाला पार्किन्सन झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. खरेतर वयाच्या 60 व्या वर्षांनंतर होणारा हा आजार आहे. मेंदू आणि मज्जातंतू तज्ज्ञ या समस्येला एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये होणार्‍या लग्नांना जबाबदार मानतात. 

मेंदूतज्ज्ञ डॉ. उदय मुथाने यांच्या मते हा आजार ऑटोसोनल रिसेसिव आहे, जो गुणसूत्राच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातो. कुटुंबात एखाद्या व्यक्तीला पार्किन्सनचा आजार असल्यास मेंदूतील पेशींच्या माध्यमातून हा दुसर्‍या पिढीत जाण्याची शक्यता असते.


थॉयरॉइड तरुणांना होणारा हा एक प्रमुख आजार आहे. कमी वयातच हायपोथायरॉइडचे लक्षण दिसू लागतात हे अनेक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. यात थॉयराइड ग्रंथीचे कार्य वाढल्याने चयापचय क्रियेचा स्तर वाढतो. चयापचय क्रियेचा वेग वाढल्याने संबंधित व्यक्तीचे वय वेगाने वाढू लागते. 

धूम्रपान, तणाव आणि अहितकार आहार सवयी अशी याची कारणे असू शकतात. ही समस्या अनुवांशिक असल्यामुळे मुलांमध्ये सुद्धा याची लक्षणे आढळतात. थायरॉइडने पीडित युवांना पक्षाघात धोका 44 टक्क्यांनी वाढतो.


स्मरणशक्ती घटण्याची कारणे


पुरेशी झोप न होणे : 
युवकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. पुरेशी झोप न झाल्याने मेंदूचा स्मरण करणारा महत्त्वाचा ठरणारा काही भाग प्रभावित होतो.


थायरॉइड : 
हायपोथायरॉइडिज्म सारख्या थायरॉइड आजारामुळे कमी वयात स्मृतीत घट होऊ लागते.


निकृष्ट आहार : 
पोषक आणि संतुलित आहाराचा अभाव असल्यास त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. व्हिटामीन बी 1 ची कमतरता असल्यास स्मरणशक्ती जास्त कमकुवत होते.


तणाव : 
सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा तणाव इतर गोष्टी विसरण्यास भाग पाडतो. तणावाचा वेगवेगळ्या पद्धतीने स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होत असतो.
थोडे नवीन जरा जुने