ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू- ना. प्राजक्त तनपुरे


राहुरी शहर : सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन ऊर्जा, नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्यांसंदर्भात ग्रंथालय मित्रमंडळ चळवळीचे संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालय प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने ना. तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने यावेळी सांगितले की, ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यापासून थेट भटक्या विमुक्तांच्या पालापर्यंत वाचन संस्कृती रूजविण्यासाठी ग्रंथालय मित्रमंडळ कार्यरत आहे. 

सार्वजनिक ग्रंथालये टिकवण्यासंदर्भात वर्षानुवर्षे सरकारी स्तरावरून केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत. खासगी ग्रंथालयांप्रमाणे चकाचक वाचनालये, टॅब वगैरे सुविधा, द्रूकश्राव्य माध्यमातील साहित्य ठेवा इत्यादींच्या माध्यमातून योजना आखली गेली होती. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीच्या माध्यमातून हे प्रकल्प राबविले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, काहीच झाले नाही. गाव तेथे ग्रंथालय ही घोषणा करूनही महाराष्ट्रात ४५ हजारपैकी केवळ १२ हजार गावात सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत आहेत.

सार्वजनिक ग्रंथालयाकडे निवृत्तांच्या जोडीला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे, पण तुटपुंजे अनुदान आणि नवीन ग्रंथालयांना मान्यता न देणे, दर्जाबदल नाकारणे यामुळे वाचन चळवळीस खीळ बसली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी संभाजी पवार, प्रा. संजय तमनर, अनिल लोहकरे यांनी ना. तनपुरे यांच्याकडे केली.

यावर ना. तनपुरे म्हणाले, वैचारिकदृष्ट्या सक्षम पिढी घडविण्यासंदर्भात ग्रंथालयाचे महत्व लक्षात घेऊन ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ, दर्जाबदल, नवीन मान्यता या व इतर प्रश्नासंदर्भात संबंधितांची मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
थोडे नवीन जरा जुने