तलवार व पिस्तुलाच्या धाकाने तीन लाखांची लूट...


जामखेड : येथील संत गोरोबाकाका सिनेमागृहातून तालुका पाटोद्याचे भाजपच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्षास तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसवून साकत परिसरात नेवून जबर मारहाण करून, सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. 

मात्र याबाबत जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने बीडच्या खासदार प्रितम मुंडे, विधानसभेचे आमदार सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला धाव घेवून पोलिस ठाण्यात ठिय्या दिल्याने रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर असे की, शाम अर्जुन हुले आपल्या मित्रांसह शुक्रवारी चित्रपट पाहण्यासाठी आला होता. चित्रपटाचा मध्यांतर झाल्यावर महादेव भीमराव खाडे (रा. करंजवण. ता.पाटोदा), ऋषिकेश गोवर्धन सानप, महेश गोवर्धन सानप, कृष्णा ज्ञानदेव बडे (तीघे. रा.सौताडा ता.पाटोदा), स्वप्निल उर्फ राणा सदाफुले, सनी उर्फ प्रिन्स सदाफुले (दोघे रा.जामखेड व इतर आनोळखी एक) अशा सातजणांनी हुले यांना सिनेमागृहाच्या बाथरूमकडे नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर सिनेमागृहाबाहेर ओढत नेत डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून गाडीत बसवले.

 यानंतर साकत परिसरातील एका शेतात तलवारीचा धाक दाखवून हॉकीस्टिकने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांच्या खिशातील सोन्याचे ब्रासलेट लॉकेट व रोख रक्कम असा एकूण २ लाख ९३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनेनंतर फिर्यादीस त्याच ठिकाणी सोडुन आरोपी चारचाकी वाहनातून निघून गेले.

दरम्यान शनिवारी हुले हे याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गेले असता, पोलिसांनी केवळ तक्रार अर्ज घेतला मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी नंतर येण्याचे सांगितले. याबाबत त्यांनी खासदार प्रितम मुंडे यांना फोन करून सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून खा.मुंडे, माजी महसूल मंत्री सुरेश धस व माजी आ.भीमराव धोंडे व तालुक्यातील पदाधिकारी जामखेड पोलिस स्टेशनला येवून ठाण मांडुन बसले. 

भाजपचे खासदार व माजी आमदार पोलिस स्टेशनला आल्याचे कळताच तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली होती. उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी वरील आरोपींविरोधात अपहण, मारहाण व आर्म ॲक्टसह गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा ज्ञानदेव बढे या आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
थोडे नवीन जरा जुने