फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते !


मुंबई : भाजपाचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या कोणतेही काम नाही. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. ताळमेळ नसल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मात्र असेच थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. हे स्वाभाविक आहे. मंत्रीपदांची संख्या मर्यादित असल्यामुळे असे होणारच. परंतु सर्व पक्ष आपापल्या पक्षातील नाराजांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. खातेवाटपाबाबत काही घोळ नाही. मुख्यमंत्री ते कधीही जाहीर करतील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच जीएसटी आयुक्तांशी चर्चा केली. या वेळी जीएसटी आयुक्तांनी वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे सविस्तर चित्र मांडले.

त्यानुसार जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न घटल्याची माहिती समोर आली. याची नुकसानभरपाई केंद्र सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र ही नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने