तरुणांनी सकारात्मक मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी 'ही' माहिती वाचलीच पाहिजे !


तुमच्या भावनांबद्दल इतरांशी बोला
तुमच्या मनात निर्माण होणा-या कोणत्याही भावनांविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तिसोबत बोला. जेणेकरून तुमच्या भावनांना मोकळी वाट मिळेल. तुम्हाला अस्वस्थ, उदासीन वाटत असेल अशा वेळी काही गोष्टी काळावर सोडून द्या. कारण काळ हे एक उत्तम औषध असतं. आपली तब्येत उत्तम होण्यासाठी किंवा आपल्याकडून काहीतरी चांगलं होण्यासाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो.

सकस अन्न खा


आपलं खाणं आणि आपल्या भावना यात एक प्रकारचं नातं असतं. उदाहरण द्यायचं झालं तर कॅफीन आणि साखर यांचा शरीरावर त्वरीत परिणाम होत असतो. म्हणूनच आपण दररोज जे अन्न सेवन करतो त्याचादेखील नकळतपणे आपल्या शरीरावर परिणाम होत असतोच. हा परिणाम दीर्घकाळ टिकतो. म्हणूनच नेहमी चांगलं सकस अन्न सेवन करावं.

संपर्कात राहा

मित्रमैत्रिणी आणि कुटुंब नेहमीच आपल्याला प्रत्येक गोष्टीत सामावून घेतात. तसंच आपली काळजीही घेत असतात. त्यांच्यासोबत तुम्ही मन मोकळं केलं की तुम्हाला त्यांचे विचार कळतात, त्यामुळे आपल्या डोक्यातल्या विचारांना चालना मिळते. याचा फायदा तुम्हाला नेहमीच कार्यतत्पर राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं मन शांत राहतं. समस्या काही प्रमाणात सोडवण्यात त्यांची मदत होते.

कामातून ब्रेक घ्या

कामात किंवा ठिकाणात बदल हा मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असतो. मग तो ब्रेक अगदी पाच मिनिटांचा का असेना, घरकामातून पाच मिनिटं शांत बसा. ऑफिसमध्ये काम करत असाल तर अर्ध्या तासाचा लंच ब्रेक घ्या. शनिवार-रविवार कुठेतरी फिरायला जाणं हा अतिशय चांगला ब्रेक ठरू शकतो. ज्यामुळे काम करायला उत्साह येतो. काही मिनिटं जरी आपण वेगळं व आवडीचं काम केलं तर तणाव काहीसा कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला उत्साह वाटतो.

स्वत:ला स्वीकारा
काही जण समोरच्याला हसवण्याचा प्रयत्न करतात, काही जण गणितात हुशार असतात तर काही जण जेवण बनवण्यात तर काही जण आणखी कशात तरी. कित्येकदा आपण आपलं राहणीमान, जीवनशैली आपल्या जवळच्या व्यक्तिसोबत शेअर करत असतो. पण प्रत्येक जण आपल्यासारखा असेलच असं नाही किंवा आपल्यात त्यांच्याप्रमाणेच बदल होईल असं नाही. प्रत्येक जण हा वेगळा असतो. प्रत्येकाच्या अंगी वेगळं कौशल्य असतं. आपण जसे आहात तसं स्वत:ला स्वीकारावं.

कार्यतत्पर राहा
व्यायामाने मेंदुत विशिष्ट प्रकारची रसायनं स्र्वतात, जेणेकरून आपल्याला बरं वाटतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नियमित व्यायामामुळे तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तसंच तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

इतकंच नाही तर झोप चांगली लागते, तुम्ही ताजेतवाने, तरुण दिसता आणि तुम्हाला स्वत:लाच खूप छान वाटतं. व्यायाम तुमच्या मेंदूला आणि तुमच्या इतर अवयवांनाही निरोगी ठेवण्याचं काम करतो.

व्यसनांना दूर ठेवा
आपल्याला चांगलं वाटावं किंवा आपला मूड बदलावा म्हणून कित्येक जण व्यसनांच्या आहारी जातात. काही जण तर त्यांचा एकाकीपणा आणि भीती यापासून दूर राहण्यासाठी अवाजवी नशा करतात, पण नशा किंवा इतर व्यसनांमधून मिळणारा दिलासा हा तात्पुरताच असतो.

इतरांची मदत मागा
एक लक्षात ठेवा आपण कोणीही श्रेष्ठ किंवा ताकदवान नसतो. कधी कधी आपणही खूप थकतो किंवा एखादी चुकीची गोष्ट घडली की आपण भावनाविवश होतो. आपल्यावर कामाचा खूप ताण आहे, आणि एकटय़ाकडून एखादं काम होणार नसेल तर मदत मागायला अजिबात लाजू नका.

चांगलं वाटेल असं काहीतरी करा
कोणाला गाणी ऐकायला, तर कोणाला पुस्तक वाचायला, कोणाला स्वयंपाक करायला तर कोणाला आणखी काही करायला आवडतं असतं, ज्यात आपण आपलं भान विसरून जातो. तुम्हाला काय छंद आहेत हे जाणून घ्या आणि त्यात रमण्याचा प्रयत्न करा. त्यामुळेही तुम्ही तणावापासून काहीसे लांब राहता.

दुस-यांची काळजी घ्या
दुस-यांची काळजी घेणं ही तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या, अशी दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या जवळच येता. तुमच्यात विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांची सोबत मिळते. त्यातून देखील मानसिक ताण कमी होतो.
थोडे नवीन जरा जुने