'हे' साधे सरळ उपाय करून तुम्ही फिट राहू शकता...


वजन कमी करण्यासाठी नेहमी एका निरोगी प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे. या फे-यात अडकून आजारी पडाल किंवा कमी पोषण मिळाल्याने शरीराला नियमित कामे तडीस नेण्यास अडथळेही येऊ शकतील. 

वजन कमी करणा-या प्रक्रियेचा अंगीकार करणा-यांनी डाएट आणि व्यायाम यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कसा असावा डाएट प्लॅन आणि व्यायामाचे वेळापत्रक.

हे करावे 

दिवसभरात नियमित अंतराने थोडे-थोडे जेवण करावे.
 
जेवणात उच्च प्रथिने आणि तंतुमय पदार्थ हवेत. उदाहरणार्थ अंड्यातील पांढरा भाग, डाळ, शेंगा, कमी मेद असलेले दुग्धजन्य पदार्थ, ओट्स, ब्रोकोली, पपई, संत्रा आणि पेरू. 

अन्न शिजवण्यासाठी कमी मेद वापरावे. उदाहरणार्थ कॅलरी (उष्मांक) कमी ठेवण्यासाठी ग्रिल्ड किंवा रोस्टेड खाद्यपदार्थांना प्राधान्य द्यावे. 

 मोनोसॅच्युरेटेड फॅट असलेले खाद्यतेल प्राधान्याने वापरावे. यामध्ये आढळून येणारे फॅटी अ‍ॅसिड वाईट कोलेस्टेरॉल नष्ट करते. 

हे कदापि करू नये 
डाएटद्वारे मेद एकदमच कमी करू नये. ओमेगा-3 आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स (एकल असंपृक्त मेद) शरीरासाठी आवश्यक आहेत. जर तुम्ही मांसाहारी असाल तर रेड मीटचे (लाल मटन) सेवन करू नये. 
उपवास करू नये आणि शिळे अन्न खाऊ नये. अशा प्रकारे शरीराची बीएमआर पातळी म्हणजेच बेसिक मेटाबॉलिक रेट (मूलभूत चयापचय वेग) मंदावतो. थोड्या-थोड्या फरकाने काही ना काही खात राहिल्याने बीएमआर पातळी संतुलित राहते. 

घाम गाळावा 

एकदा संतुलित डाएट प्लॅन आखल्यानंतर शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्याबाबत विचार करावा लागेल. यासाठी नियमित व्यायाम करावा. धावणे, पोहणे, सायकलिंग करणे किंवा एरोबिक व्यायाम उपयुक्त ठरेल. 

यासोबतच शक्य होईल तितक्या शारीरिक हालचाली कायम ठेवाव्यात. उदाहरणार्थ - कार्यालय किंवा घरात जर लिफ्ट असेल आणि तुम्ही दुस-या किंवा तिस-या मजल्यावर राहत असाल तर पाय-या चढूनच जावे. काही काळ पायी चालावे.
थोडे नवीन जरा जुने