नववर्षात बदलेले आहेत 'हे' आर्थिक नियम, जाणून घ्या...पॅनकार्ड, पीएफ, विमा, दागिने, ऑनलाईन व्यवहार यांचे बदलते नियम


मुंबई : बुधवार, १ जानेवारी २०२० पासून म्हणजेच नववर्षात नवे आर्थिक नियम अंमलात येणार आहेत. यामध्ये पीएफ, विमा, दागिने, ऑनलाईन व्यवहार यांच्याशी संबंधित नियमांचा समावेश आहे. त्याचबरोबर पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यास सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ देखील दिली आहे.

पॅनकार्ड अजूनही आधारकार्डशी न जोडलेल्यांसाठी सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने येत्या मार्च २०२० पर्यंत वाढवली आहे. आधीची मुदत ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपली आहे. आयकर कायदा १९६१ मधील तरतूद १३९अ नुसार, पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक असायला हवे. 

यासाठीची मुदत आता ३१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० करण्यात आल्याची माहिती सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. केंद्र सरकारने या कामासाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली आहे.

नववर्षात १० कर्मचारी असलेल्या कंपन्यांनाही पीएफच्या कक्षेत यावे लागणार आहे. त्यांना पीएफसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच कर्मचारीच त्यांच्या पीएफमध्ये किती रक्कम टाकावी हे ठरवू शकणार आहेत. भारतीय स्टेट बँकेने कर्ज स्वस्त केले आहे. ०.२५ टक्के एवढी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. याचा फायदा जुन्या ग्राहकांनाही मिळणार आहे. कारण त्यांची रिसेट करण्याची तारीखही १ जानेवारीच असणार आहे.

 'एनईएफटी'वर बुधवारपासून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एनईएफटी आता आठवड्याचे सात दिवस २४ तास करता येणार आहे. भारत बिल पेमेंटवरून प्रीपेड सोडून सर्व बिलांचा भरणा करता येणार आहे. सोने खरेदी करताना आता प्रत्येक दुकानदाराला हॉलमार्कचे सोने विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात एक वर्षाची सूट देण्यात आली आहे. हा नियम २००० पासून लागू आहे, मात्र बंधनकारक नव्हता. यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

५० कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांकडून रुपे किंवा यूपीआय क्यूआर कोडद्वारे पैसे देण्यावर कोणतेही शुल्क घेतले जाणार आहे. विमा पॉलिसी महागणार असून चेंज लिंक्ड आणि नॉन लिंक्ड जीवन विमा पॉलिसीमध्ये बदल करण्यात येणार आहे. यामुळे विम्याचा हप्ता महागणार आहे, तर एलआयसीने क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास लागणारे शुल्कही माफ केले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक चिप असलेले कार्डच एटीएममध्ये चालणार आहे. मॅग्नेटिक स्ट्रीपचे जुने कार्ड असेल तर ते बदलून घ्यावे लागणार आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक 'वन-टाइम पासवर्ड'(ओटीपी) आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली अंमलात आणणार आहे. बुधवार, १ जानेवारी २०२० पासून ही नवीन प्रणाली अंमलात येणार आहे. 

एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ओटीपी प्रणालीअंतर्गत रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना बँकेकडे असणाऱ्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाणार आहे. 

हा नियम १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना लागू असणार आहे. एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. यामुळे अवैध व्यवहार रोखू शकतील, असे बँकेचे म्हणणे आहे.
थोडे नवीन जरा जुने