मेरुदंडाचं आरोग्य सुधारून कार्यक्षमता वाढेल,रोज सकाळी करा हे काम !पाठीचा कणा अथवा मेरुदंड आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग समजण्यात येतो. ‘आपलं वय पाठीच्या कण्यावर अवलंबून आहे’ असं म्हणतात. मेरुदंडातील मणक्यांवर कमी-जास्त दाब देऊन त्यांना योग्य रीतीने ताणून किंवा वक्र करून अनंत रोग बरे करण्याचं शास्त्र फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.


मेरुदंड हा ज्ञानतंतूंचा आधार आहे. ज्ञानसंस्था कार्यक्षम ठेवायची असेल तर या आधाराची काळजी घेणं, आरोग्यसंपन्न राहण्याकरिता आवश्यक आहे. योगशास्त्रातील अनेक आसनं मेरुदंडाचा लवचिकपणा कायम ठेवतात. त्यातील रुधिराभिसरण वाढवतात व मेरुदंडाचं आरोग्य सुधारून त्यांची कार्यक्षमता वाढवतात. मेरुदंडास मागे वाकवणा-या चार निवडक आसनांपैकी एक भुजंगासन आपण पाहूया.

भुजंगासन

या आसनात पायाच्या चवडय़ापासून नाभीपर्यंतचा शरीराचा भाग जमिनीवर टेकून कमरेपासून मस्तकापर्यंतचा भाग पाठीच्या स्नायूंच्या बळावर वर उचलला जातो. त्यामुळे उचललेला भाग नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो, म्हणून याला भुजंगासन असं म्हणतात.
कृती

छातीवर झोपावं हात शरीराच्या बाजूस ठेवावे. चेहरा एका बाजूस ठेवावा, पाय सुखावह स्थितीत एकमेकांजवळ ठेवावे.


प्रथम दोन्ही गुडघे, दोन्ही टाचा व पायांचे दोन्ही चवडे एकमेकांजवळ ठेवावे. कपाळ जमिनीवर टेकावं.

दोन्ही हात कोपरात दुमडून हाताचे तळवे छातीच्या दोन्ही बाजूंना अशा रीतीने ठेवावे की, दोन्ही अंगठे स्तनाग्राच्या रेषेत येतील.

तळहात जमिनीवर ठेवताना तर्जनी ते करंगळी ही चार बोटे एकमेकांजवळ व अंगठे बाजूस ठेवावे.


कपाळ पुढे घेऊन नाकाने जमिनीस स्पर्श करावा. नंतर नाक पुढे घेऊन हनुवटीनं जमिनीस स्पर्श करावा. हनुवटी जितकी पुढे नेता येईल तितकी पुढे न्यावी व वर न्यावी.

नंतर मानेचे स्नायू आकुंचित करून केवळ त्यांच्या बळावर मस्तक वर व मागे न्यावं.

नंतर खांदे मागे नेऊन खांद्यांची हाडं एकमेकांजवळ आणावीत.

पाठीच्या स्नायूंचे आकुंचन करून केवळ त्यांच्या बळावर नाभीपासून शरीराचा वरचा भाग वर उचलावा व मागे झुकवावा.

ही अंतिम स्थिती बराच वेळ धारण करीत असताना व नंतरही हातांचा आधार व बाहूंच्या स्नायूंचं बळ उपयोगात आणू नये.
फायदे

पोटाच्या व छातीच्या स्नायूंवर ताण पडून त्यांचा लवचिकपणा वाढतो व त्यामुळे श्वसन, पचन व उत्सर्जन क्रिया सुधारतात.

कंठ ताणल्यानं रक्तसंचयामुळे होणारा घशाचा त्रास नाहीसा होतो. कंठग्रंथींचं आरोग्य वाढतं.

पाठीच्या स्नायुसंकोचामुळे मेरुदंडाचे लहान-लहान स्नायुबंध, पाठीचे स्नायू दृढ होतात. पाठीच्या कण्यातील रुधिराभिसरण सुधारून त्यातून जाणारे ज्ञानतंतू ताजेतवाने होतात. पाठीच्या कण्यातील लवचिकपणा टिकतो व वाढतो. मणक्यातील किरकोळ स्थानभ्रष्टता त्याच्या नित्य अभ्यासाने दूर होते.
थोडे नवीन जरा जुने