जबाबदार लोकांनी आपला देश धर्मनिरपेक्ष असल्याचे विसरू नये !


लखनऊ : मोदी सरकार जातीय दृष्टिकोनातून राज्यघटनेवर घाला घालण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप बसप प्रमुख मायावती यांनी बुधवारी केला. सोबतच सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार होणार नाही याबाबत सावध राहण्याची गरज व्यक्त केली. 

गतवर्षाप्रमाणे नवीन वर्ष हे वेदनादायी ठरू नये. केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या संकुचित मानसिकता व जातीय दृष्टिकोनामुळे २०१९ मध्ये राज्यघटनेला कमकवुत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील वर्ष हे हिंसाचाराच्या घटनांनी संपष्टात आले ही बाब अत्यंत चिंताजनक व दुर्दैवी आहे. 

कोणत्याही धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि देशातील प्रचलित मैत्रीच्या वातावरणाला तडा जाऊ नये, अशा पद्घतीने आंदोनलाची दिशा असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. 

जबाबदार पदावर असलेल्या लोकांनी आपला देश हा धर्मनिरपेक्ष असल्याचे विसरू नये. देशातील लाखो लोक आपापल्या धर्माचे पालन करतात. प्रत्येकाची राहण्याची व जीवन जगण्याची पद्घत आहे. आपण त्यांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.
थोडे नवीन जरा जुने