शपथविधी सोहळ्याला गैरहजर का होते? राउत म्हणाले...!


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा सोमवारी विस्तार झाला. तिन्ही पक्षांच्या मिळून एकूण ३६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शिवसेना खासदार संजय राऊत गैरहजर राहिले. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले. 

राऊत यांचे बंधू शिवसेना आमदार सुनील राऊत यांनाही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सुनील राऊत शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारले असता शिवसेनेकडे फार कमी पर्याय होते. तीन पक्षांचे सरकार असल्याने सर्वांना समसमान संधी द्यायची होती, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र दै. 'सामना'चे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी महाआघाडीचे सरकार स्थापन होण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यामुळेच सुनील राऊत यांना मंत्रिमडळात स्थान मिळेल, अशी अटकळ होती. 

पण उद्धव ठाकरे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत रामदास कदम, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, दिवाकर रावते आणि तानाजी सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला नाही. सुनील राऊत यांना दूर ठेवणे आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या राजकीय पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया एकप्रकारे सारवासारव करणारी आहे. शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहिल्याबद्दल विचारले असता, 'मी 'सामना'च्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही,' अशी सारवासारव संजय राऊत यांनी केली.
थोडे नवीन जरा जुने