देव भक्ताच्या भक्तीमुळे सदैव भक्ताच्या पाठी उभा असतो


जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन।भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥


अभंगाचा सखोल अर्थ स्पष्ट होण्यासाठी लागणारी माहिती.

१) महाराजांनी आपल्याला पहिल्या अभंगात जन्माची कारणे तसेच दु:ख भोगावे कां लागते हे सांगून ह्यातून सुटके साठी परमार्थ साधन करावे हे सांगितले आहे.

२) त्यानंतर चित्तशुद्धीचे महत्व सांगणारा अभग दुसरा आहे. त्यामधे ब्रह्मज्ञानी सदगुरुंना शरण जावे हा उपदेश महाराजाम्नी केला आहे.

३) आता ह्या तिसऱ्या अभगामधे; तुकाराम महाराज आपल्याला तीन मुद्दे सांगताहेत अ) अशा चित्तशुद्धीमुळे काय होते?

ब) चित्तशुद्धी व्हावी म्हणून आपण काय प्रयत्न करावे? किती वेळ करावे?
क) भवंताशी ऐक्य कोणाला लाभते. अर्थात मुक्ती कोणाला मिळते?

सर्वप्रथम मुक्ती मिळते म्हणजे काय ते थोडक्यात पाहून आपण अभंगाकडे वळणे उचित होईल.

भक्तीचे सर्वोत्तम फळ म्हणजे भगवंताची भेट होणे. भेट होणे ह्याचा अर्थ भकत व भगवंताचे ऐक्य होणे ह्याअर्थाने आपण येथे घ्यायला हवा. भ्गवंत अमर्याद आहे , अजन्मा आहे व मृत्यातीत अर्थातच आहे. तो सत्‌ चित्‌ आनंदमय आहे. जेंव्हा भक्ताचे भगवंताशी ऐक्य घडते तेंव्हा तो पण जन्म मृत्यातीत सच्चिदानंदस्वरूपच होते.

येथे एक शंका येईल की असे खरेच होत असेल कां? पण जर आपण कोणत्याही संत पुरूषाचे चरीत्र पाहीले तर असे आढळते की संत असेच होते. त्यामुळे ते जरी शरीरत्याग करून गेले तरी त्यांच्या भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत असतात. योगी अरविंदांना विवेकानंदांनी अरबिंदो तुरुंगात असताना मार्गदर्शन केले असे एक उदाहरण मला येथे आठवते. निर्याणानंतर कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिले व त्यांच्या मनाचे समाधान केले ही कथा पण जगप्रसिद्ध आहे.

जोवर भक्त व भगवंत वेगळे असताता तोवर अशा भक्तावर मायेचा प्रभाव ह्या वेगळे असण्यामुळेच होत असतो. ह्या मायेच्या प्रभावामुळे अशा भक्ताच्या मनामधे दु:ख, करूणा, अशा ह्या भावांचा पण आविष्कार होतो.

पण जेंव्हा आत्मज्ञान होते व भक्त भगवंताचे ऐक्य घडते व मोक्षप्राप्ती होते.

हेच खरेतर प्रत्येक जीवात्म्याचे मूल ध्येय असते. पण जन्म होताक्षणीच मायेच्या प्रभावाखाली येऊन तो ते विसरतो. पुढे पूर्वसुकृतानुसार मुमुक्षुत्व निर्माण होते व भक्त आपल्या ध्येयप्रप्प्तीसाठी प्रयत्न करू लागतो. शेवटी जेंव्हा ध्येय प्राप्ती होते भक्त भगवंताचे ऐक्य होऊन भक्त ब्रह्मरूप होतो
.
श्रीमद्‍ भगवद‌गीतेमधे स्थितप्रज्ञाची लक्षणे अर्जूनाने विचारली त्याचीच येथे आपल्याला आठवण होते.
थोडे नवीन जरा जुने