निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवल्याने शरीरात होतील 'हे' सकारात्मक बदल !


अधिक व्यग्र असणे आणि सवडीचे काही तास नेहमीच घरात घालवणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते घराबाहेर मोकळ्या हवेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो. यामुळे तणावातून मुक्ती मिळते आणि स्वभाव आनंदी राहतो. शुद्ध हवेशी तुम्ही कशा प्रकारे संपर्क वाढवू शकता त्याबाबत जाणून घेऊया.

स्वयंपाकघरातून बाहेर निघा - 

गृहिणी असो किंवा नोकरदार महिला, सर्वांनाच स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळावी लागते. तज्ज्ञांच्या मते काम करण्याबरोबरच तुम्ही शुद्ध हवेच्या संपर्कात राहू शकता. एखादेवेळी बागेतही स्वयंपाक केला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ - खुल्या जागेवर दाल-बाटी किंवा दाल-तडक्याची पार्टी ठेवावी. यामुळे महिलांच्या जीवनशैलीत थोडा बदल होईल आणि त्या बंद स्वयंपाकघरातून बाहेर निघू शकतील. त्याचबरोबर कुटुंबीयांना मजा येईल.
जिममध्ये व्यायाम करू नये - वेळेअभावी अनेक जणांना जिममध्ये व्यायाम करणे सोईस्कर वाटते. याउलट तज्ज्ञ म्हणतात की, बागेत व्यायाम केल्याने भरपूर शुद्ध हवा मिळते आणि थकवाही जाणवत नाही. तसेच संपूर्ण व्यायाम कालावधीत ऊर्जाही टिकून राहते.

जे लोक बाग किंवा मोकळ्या जागेवर जॉगिंग करतात त्यांना ट्रेडमिल किंवा अधिक वाहतूक असलेल्या जागेवर जॉगिंग करणार्‍यांच्या तुलनेत 15 टक्के जास्त तरतरीत असल्यासारखे वाटते, असे 2003 मध्ये झालेल्या एका स्वीडिश संशोधनातून समोर आले आहे. तसेच मुलांकडून हायकिंग किंवा ट्रेकिंग करवून घेतल्याने त्यांनाही चांगले वाटते. मुलांना ही सवय अवश्य लावावी.

निसर्गाशी मैत्री करावी - बागेत रंगीबेरंगी फुलझाडे आणि हिरव्या पालेभाज्या लावणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यामुळे सुंदर फुलपाखरे आणि पक्षी बागेकडे आकर्षित होतील. तसेच लहान मुलेच नाही तर मोठय़ांचे मनही काही काळ रमेल. यामुळे ऑक्सिजनही भरपूर मिळेल. तज्ज्ञांच्या मते चिमण्यांचा आवाज ऐकून आणि हिरवेगार दृश्य पाहिल्याने अनावश्यक तणाव आणि चिंतेपासूनही मुक्ती मिळेल.

बाहेर वेळ घालवा -‘नॅशनल वाइल्डलाइफ फेडरेशन’नुसार, आई-वडिलांनी आपल्या मुलांबरोबर बाहेर म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला पाहिजे. आठवड्यातून एकदा नियमितपणे हा नियम पाळावा. यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यासारखे वाटेल. जर हे शक्य नसेल तर दीर्घ प्रवासाला निघून जावे किंवा रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी.
थोडे नवीन जरा जुने