वारंवार तोंड येतंय? जाणून घ्या कारणे आणि उपाय !


तसे पाहिले तर साधा, पण त्रास सुरू झाल्यावर कटकटीचा वाटणारा आजार म्हणजे वारंवार तोंड येणे, तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे यालाच ‘स्टोमॅटायटिस’ किंवा अफ्थरस अल्सर असे म्हणतात.

तोंड येण्याची कारणे - एखादी वस्तू टोचल्यास : दात घासताना अनवधानाने ब्रश करताना ओठाला टोचू शकतो, त्याचप्रमाणे दातामध्ये घालण्यात येणारी काडी, टूथपिक वा अन्य साधनेही क्वचितप्रसंगी ओठाला, हिरडीला टोचू शकतात. कित्येकदा घाईगडबडीने जेवताना काही कडक पदार्थही (उदा. टोस्ट, पापड, माशाचे काटे,) टोचू शकतात. अशा प्रकारे तोंडातील अंतरत्वचेला इजा झाल्यास तेथे व्रण पडू शकतो.

रासायनिक पदार्थांचे सेवन : काही जणांना व्यवसायानिमित्त (पॅथॉलॉजी टेक्निशियन्स, सोन्याचे काम करणारे कारागीर इत्यादी.) तोंडात काही रासायनिक पदार्थ घ्यावे लागतात. अशावेळी चुकून जर तोंडात आम्ल/अल्कली गेले तर तोंडाची नाजूक त्वचा जळते. त्यामुळे व्रण होऊ शकतात.

अतिउष्ण पदार्थ खाण्यात आल्यास : 

एखाद्या सेमिनारमध्ये घाईघाईने ‘डिस्पोजेबल ग्लास’मधून गरम चहा किंवा कॉफी प्यायली जाते तसेच गरमागरम बटाटेवडा, तव्यावरून, कढईतून सरळ ताटात आलेला अतिगरम पदार्थ खाताना अचानक त्वचेला चटका बसतो. भाजले जाते आणि व्रण होतात.

औषधामुळेही : 

बरेच दिवस मोठय़ा प्रमाणात प्रतिजैविके व वेदनाशामक औषधे घेतल्यास शरीरास उपयुक्त जिवाणूदेखील मारले जातात. शिवाय अशा औषधांच्या जोडीला पूरक म्हणून जीवनसत्त्वाची औषधे घेतलेली नसल्यास आवश्यक जीवनसत्वे कमी होतात. त्यामुळेदेखील तोंडात व्रण पडू शकतात.

जीवनसत्त्वाचा अभाव : 

आहारात जीवनसत्त्व अ, ब आणि क (विशेषत: फोलिक अँसिड, सियानो कोबाल्मिन इत्यादी) यांचा अभाव असल्यास किंवा झिंक, लोह, तांबे इत्यादी खनिजांचा अभाव असल्यास पेशीच्या कडा कमकुवत होऊन भिन्न-भिन्न पेशीमधील एकसंधपणा कमी होतो. तिथे व्रण पडतात. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे जीभ लालभडक होते. जीभ गुळगुळीत होणे. जिभेला आणि ओठांना चिरा पडणे, अशी लक्षणे दिसू लागतात. जीवनसत्त्व क च्या अभावामुळे हिरड्यांना ‘स्कव्र्ही’ नावाचा आजार होतो, तर लोह खनिजद्रव्यांच्या अभावामुळे हिरड्या पांढर्‍या पडतात.

काही आजार : 

यातही प्रामुख्याने ताप, अपचन आणि आम्लपित्ताचा त्रास असणार्‍यांच्या तोंडात व्रण पडतात. याशिवाय अँस्पिरिन बर्न, दाताच्या कडा धारदार झाल्यास, अक्कलदाढ उगवताना, दाताच्या अयोग्य रचनेमुळे, तंबाखू, पान, सुपारी, गुटखा यांचे अतिसेवन करणार्‍यांना तोंड येण्याचा त्रास जाणवतो.

दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आजचे आयुष्य कितीही प्रगतिमान झालेले असले तरी या आयुष्याला एक मोठा शाप आहे तो म्हणजे- ऐहिक सुखसमृद्धीचा. त्याच्या जोडीला असह्य असलेला मानसिक ताणतणाव यामुळे रक्तदाब वाढणे, मधुमेह, हृदयविकार, निद्रानाश, भूक मंदावणे यामुळेही वारंवार तोंड येण्याची शक्यता वाढते. तोंड येणे, तोंडात व्रण पडणे या त्रासापासून बचाव करावयाचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले.
थोडे नवीन जरा जुने