ताणतणावापासून दूर राहण्यासाठी करा कामाचे नियोजन...


नोकरी करणारी महिला असो अथवा गृहिणी असो. एरवी शांत दिसत असली तरी काही प्रसंगांमध्ये अचानक चिडते. शांत, संयमी असणारी आपली पत्नी किंवा आई शुल्लक कारणांवरून का चिडते हे नवऱ्याला, मुलांना कळत नाही.नोकरीतील ताणतणाव अथवा घरातील काही घटनांमुळे मनावर येणाऱ्या ताणामुळे काहीवेळा असे प्रसंग येतात. 


दैनंदिन जीवनात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करतच असतो. काहींजण आपल्या स्वभावानुसार त्याला जुळवून घेतात. काहीजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. 


मात्र जवळपास २० टक्के महिलांच्या आरोग्यावर ताणतणावामुळे परिणाम होताे. 

समुपदेशकाकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडे मात्र, यातील दहा टक्केच महिला उपचार घेतात. उर्वरित दहा टक्के महिला प्रतिष्ठा जाईल, म्हणून मानसोपचारतज्ज्ञाकडेही जात नाहीत किंवा त्यांचे कुटुंबीयही जाऊ देत नाहीत. महिलांच्या तणावाची कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरील कारणे आहेत. 

काही महिलांना आपल्या क्षमतेपेक्षा अधिक कामे आपल्यावर ओढवून घ्यायची सवय असते. तसेच, आपली क्षमता त्या ओळखू शकत नाहीत. स्वत:मधील क्षमता जोखून त्यानुसार काम केले, काही चुका होत असतील तर स्पष्टीकरण देण्यापूर्वी किंवा वाद होण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले आणि दैनंदिनीतील प्राधान्यक्रम ठरवले तर महिला तणावापासून दूर राहू शकतात . 
समुपदेशन, प्राणायाम, मेडिटेशन आवश्यक 

मानसोपचारतज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण महिलांपैकी केवळ ५ टक्के महिलांना प्रत्यक्ष औषधाची आवश्यकता भासते. 

उर्वरित महिलांना समुपदेशन, मेडिटेशन, प्राणायामची गरज. समुपदेशन म्हणजे तुम्हाला आवडतील,त्या गप्पा असतात. या गप्पांमधूनच वास्तवाची जाणीव करून दिली जाते. 

दैनंदिन कामातून सवड काढून मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा. 

समारंभ, नाटक, चित्रपटांना आवर्जून जा. 

प्रत्येक गोष्ट आपल्यामनाप्रमाणे होईल अशी अपेक्षा ठेवू नका. 

ताणतणावातील महिलांची लक्षणे 

उदास वाटणे, चिंता करणे, भूक मंदावणे/ वाढणे, थकवा वाढणे , लवकर राग येणे.

झोप न लागणे 

कामात वारंवार चुका होणे. लक्षात न राहणे 

मोबाइलचा वापर वाढणे 

कामांचे नियोजन न जमणे, प्राधान्यक्रम नसणे 

क्षुल्लक बाबींसाठी टोकाची भूमिका घेणे. 

कामानुसार करा वेळेचेही नियोजन 

स्वत:मधील क्षमता जोखा. इतर महिला, पुरुषांशी तुलना करू नका. 

दैनंदिनीतील प्राधान्यक्रम ठरवा. मुलांबरोबर वेळ घालवण्यास प्राधान्य द्या. तो तुमच्यासाठी आनंद असतो. 

कामानुसार वेळेचेही नियोजन करायला शिका. मोबाइलवर किती वेळ जातोय, हे लक्षात येत नाही. त्यामुळे मोबाइलपासून दूर राहा. 

मल्टी टास्किंग बनण्याचा प्रयत्न करा. एकावेळी जमतील तेवढी कामे सोबत करा.
 
वेळ काढून रोज व्यायाम कराच. झोप पूर्ण घ्या. शिळं अन्न खाणं, उशिरा झोपणं बंद करा. खाण्याच्या वेळा ठरवून घ्या. 

स्वत:साठी म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी अवश्य वेळ काढा. उदा. वाचनाने समाधान वाटत असेल तर त्यासाठी वेळ काढाच. 

सिद्ध करण्याच्या शर्यतीत वेळ वाया घालवू नका. 

मदत मागायला शिका. ते मदत करणारच नाहीत, ही भावना काढून टाका. कमीपणा स्वीकारून मदत मागा, विश्वास वाढेल. 

नात्यांमध्ये एवढा विश्वास निर्माण करा, की एखाद्यावेळी तुम्ही नकार दिला तरी समोरच्या व्यक्तीला राग येणार नाही. मोकळेपणाने बोला, नेहमी समोरच्याने समजून घेतले पाहिजे, ही भावनाही काढून टाका. 

सर्वच गोष्टी नंबर वन, बेस्ट करण्याच्या नादी लागू नका. जे काही करत आहात, त्याची उपयोगिता समजूनच नंबर, बेस्टचा विचार करा. 

कुटुंबातील सदस्यांना कामात सामावून घ्या 

नोकरी करणाऱ्या महिलेकडून घर सांभाळण्याचीही अपेक्षा कुटुंबीय बाळगतात. एकाचवेळी सर्व आघाड्यांवर यशस्वी होणे महिलेला जमत नाही. अशावेळी कुटुंबीयदेखील नकारात्मक वागतात. हे एक कारण आहे. 

नोकरीमुळे आर्थिक फायदा तर होतोच. शिवाय स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन घरी बसणे महिलांना पसंत नाही.

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, शिळे खाणे, अवेळी खाणे, झोपणे. 

कामाच्या ठिकाणी दुय्यम वागणूक मिळणे. कौटुंबिक कारणासाठी सलग दोन, तीन वेळा सुटी मागितल्यास 'घरीच बसा ना', अशी हेटाळणी होणे. 

कामाच्या ठिकाणी लहान मुलांना ठेवण्यासाठी जागा नसणे. म्हणजे प्रसूतीनंतर लगेच ऑफीस जॉईन करावे लागत असेल तर अर्धे लक्ष कामावर आणि अर्धे लक्ष मुलावर असते. 

महिलांना मिळणारा पगार स्वत: खर्च करण्याचा अधिकार नसतो. परिणामी आपण जॉब कुणासाठी करतोय, ही भावना टोचत राहते.
थोडे नवीन जरा जुने