जे अन्न सर्वार्थाने दोषी आहे तेच या लोकांना विशेषकरून आवडते


श्री कृष्ण म्हणतो की...
परंतु अशा त्या अन्नापासून तृप्ती नाही होत म्हणून त्याउपर मग तो निषिद्ध अन्नाचे सेवन करावयास लागतो. म्हणजे जे अन्न सर्वार्थाने निषिद्ध मानले गेले आहे असे अन्न सेवन करण्यास तो मागेपुढेदेखील पाहत नाही. 

ते म्हणतात पार्था येथे बघ कसा चमत्कार आहे ते, जे अन्न सर्वार्थाने दोषी आहे तेच या लोकांना विशेषकरून आवडते. 

ते म्हणतात हे लोक जे अपेय आहे तेच पितात, जे अभक्ष्य आहे आहे तेच भक्षितात आणि वर त्याप्रती हाव देखील धरतात. ते म्हणतात ज्याकोणाला येथे अशा अन्नाचीच आवड असते त्या व्यक्तीला त्याचे फळदेखील मग त्याचक्षणी मिळते. त्याक्षणीच तो पातकाचा धनी होतो जेव्हा निषिद्ध अन्न तो मुखात घालतो. ते म्हणतात असे ते भोजन भोजन नसून त्यानिमित्ताने तो यातनांचेच सेवन करतो हे जाण. 

ते पुढे म्हणतात शिरच्छेद झाल्यावर जीवाला जी काही व्यथा होते किंवा अग्नीत उडी घेतल्यास ज्या काही पीडा होतात याची कधी कोण येथे प्रचिती पहावयास जातो का? परंतु असा हा तामसी मनुष्य असे अन्न सेवन करून त्याप्रकारचे दुःखदेखील सहन करतो. म्हणूनच हे धनंजया तामस आहाराचे फळ काय आणि कोणते असते हे आता वेगळे सांगावयास हवे का? त्यामुळे ते आता असो. 

ते शेवटी म्हणतात ज्याप्रमाणे हे तीन आहार आहेत त्यासारखेच येथे यज्ञाचेदेखील तीन प्रकार आहेत, परंतु त्या तिघांमधील सर्वात आधी मी तुला सात्विक यज्ञाचे वर्म सांगतो ते ऐक
थोडे नवीन जरा जुने