वाहनांना ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करण्याचे आवाहन


मुंबई : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून ऑनलाईन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांना ऑनलाईन पीयूसी धारण करण्याचे आवाहन मुंबई (मध्य)च्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्राधिकृत प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राची माहिती केंद्र शासनाच्या https://vahan.parivahan.gov.in/puc/views/PUCCenterList.xhtml  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या मान्यतेनुसार प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) जारी करून घेण्यासाठी दुचाकी वाहनास 35 रुपये, पेट्रोलवरील तीन चाकी वाहनास 70 रुपये, पेट्रोल/ सीएनजी/ एलपीजीवर चालणारी चार चाकी वाहने 90 रुपये तर डिझेलवर चालणारी वाहने 110 रुपये केंद्र धारकांना देण्यात यावे.

केंद्र शासनाच्या दिनांक 6 जून 2017 च्या अधिसूचनेनुसार भारत स्टेज IV वाहनांसाठी एक वर्षाची वैधता तर त्या पूर्वीच्या वाहनांना सहा महिन्यांची वैधता देण्यात येत आहे. त्यानुसार आपल्या परिक्षेत्रातील अधिकृत पीयूसी केंद्राकडून आपल्या वाहनांच्या नोंदणी पुस्तकावरील नोंद असलेल्या मानांकानुसार वैध पीयूसी प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. 

वाहनांची नोंद www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जाऊन आपल्या वाहनांची संगणकीय नोंद करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने