ह्याच गुणांमुळे आपला जन्म वाया जातो


रजतमसत्व आहे ज्याचे अंगी। याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥


शब्दार्थ:- ज्याच्या अंगी सत्व रज तम हे गुण आहेत तो ह्याच गुणांमुळे जन्म वाय घालवतो तम म्हणजे फक्त नरकच होय व रजोगुण म्हणजे मायाजाळात अडकणॆ होय.

अगदी हेच श्रीमद्‍ भगव्द्‍गीतेमधे भगवान श्रीकॄष्णांनी पण खालील श्लोकामधे सांगितले आहे.

सत्वे रजस्तम इति गुणा: प्रकृतिसंभवा:। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌॥ गीता.अ.६-६

श्लोकाच अर्थ:- हे अर्जूना, सत्व, रज, तम, हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहात बद्ध करून ठेवतात.

“करावे तसे भरावे”” हा आपण वावरत आहोत त्या दॄश्य जगाचा नियम आहे. अर्थात कोणतेही कर्म केले तर त्या कर्माची फळे भोगावीच लागतात.

निषिद्ध, वाईट कर्म म्हणजे जे केल्यामुळे ईतर प्राण्यांना इजा होते, त्रास , दु:खे भोगावी लागतात ते कर्म. हे कधी प्रत्यक्ष शरीराद्वारा केले जाते, कधी वाचे द्वारा पण केले जाते . उदाहरणार्थ उद्वेगकारक कठोर बोलणे, खोटे बोलून दुसऱ्याचे नुकसान करणे, शिव्या देणे, ईत्यादी. ही कर्मे करण्याची बुद्धी तमोगुणी होय. ह्या प्रत्येक कर्माचे फळ ह्या किंवा पुढच्या जन्मात भोगावेच लागते.

बऱ्याच वेळा हा प्रश्न लोक विचारताना दिसतात की मी नीट चांगला वागूनही मला हे भोग त्रास, ताप कां आले? ह्याचे उत्तर हेच की “ पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ “ . जर ह्या जन्मात अशा कर्मांचे फळ भोगले गेले नाही तर परत जन्म येतो. शास्त्रे, गीता व संत हेच सांगतात की तमोगुणाच्या अधिपत्याखाली केलेल्या कर्मांमुळे जीव अधोगतीला जातो. त्याला पशू योनींत जन्म येतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी तमोगुणाला नरक असे अभंगात म्हटले आहे.

रजोगुण व सत्वगुणांचे दोन प्रकार असतात. १) शबल ( ह्यालाच तुकाराम महाराजांनी अभंगा,मधे सबळ असे म्हटले आहे.) २) शुद्ध .

रजोगगुणामुळे माणुस कर्म करतो. हे कर्म फक्त जगामधील निरनिराऴ्या विषयांचा उपभोग गेण्यासाठी, तसेच स्वर्गसुखासाठी जर केले;तर ते शबल कर्म ठरते. स्वार्थप्रेरित कर्म करण्याची कृती होण्यास शबल रजोगुण कारणीभूत असतो. अर्थात जगाच्या नियमाप्रमाणे ह्याकर्मांची फळे ह्या जन्मात कधी भोगायला मिळतात , तसेच कधी पुढच्या जन्मांत भोगावी लागतात. रजोगुणाला म्हणूनच “ मायाजाळ “ असे तुकाराममहाराजांनी अभंगामधे संबोधिले आहे.

सत्वगुण पण शबल असू शकतो. अशी माणसे चांगली कामे करतात पण त्या मागे स्वत:चा कांही तरी फायदा अपेक्षित असतो. उदाहरणार्थ: लोकांनी चांगले म्हणावे म्हणून, लोकांनी ज्ञानी म्हणून आपल्याला ओळखावे म्हणून सात्विक माणसे कर्म करताना आढळतात. अहंकार वाढीला लागणे हा ह्या सात्विक कर्मांचा परिणाम होय. समजा मनासारखे घडले नाही तर ह्या वासनेचे बीज तयार होते व पुनर्जन्माची तयारी नकळत होते.
नवा जन्म म्हणजे पुन्हा कांहितरी दु:खे वाट्याला येतातच.

थोडक्यात असे म्हणता येते की शबल रजोगुण, तसेच शबल सत्व गुण पण जीवाला जन्ममृत्यू चक्रामधे फिरवित राहतात.

शुद्ध रजोगुणाच्या प्रभाव खाली माणसाच्या हातून शुभकर्मे होतात, जसे पूजाअर्चा, तीर्थयात्रा, दानधर्म वगैरे.

शुद्ध सत्वगुणाचा प्रभाव असेल तर ही सर्व कर्मे नि:ष्काम भावाने: ईश्वराची पूजा म्हणून केली जातात. त्यामुळे मन:शुद्धी नक्की होते. पण खरे ज्ञान ह्यामुळे मिळत नाही. अहंकार क्षीण होतो पण समूळ लयाला जात नाही.

अशा व्यक्तींना जर ह्याच जन्मी मोक्ष, मुक्ती मिळाली नाही तर त्या उत्तम कुळात जन्म घेतात व त्यानंतर मुक्त होतात असे गीतेमधे भगवंताने ६ व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे.
म्हणूनच तुकाराम महाराजा अभंगात म्हणताहेत की

“रजतमसत्व ज्याचे अंगी आहे ज्याचे अंगी त्याचा याच गुणांमुळे ह्या जगी जनम वाया गेला ॥ ३॥
 तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
थोडे नवीन जरा जुने