तरुणांनी स्वसामर्थ्य ओळखून दृढनिश्चियी, कणखर, मजबूत होणे अपेक्षित!!!विवेकाची सजगता कायम जागरूक असायला हवी, म्हणजे विकृत विचारांचे होणारे हल्ले वास्तवाच्या पुराव्यासह परतवता येतात. ज्यामुळे स्वत:ची व समाजमनाची शांती, समाधान प्रवाही राहील.

नॉर्वेचा ज्येष्ठ नाटककार म्हणतो, कोणतीही व्यक्ती ती ज्या समाजाचा घटक असते, त्या समाजाबद्दलची जबाबदारी आणि अपराधभाव झटकून टाकू शकत नाही. म्हणजेच व्यक्ती ज्या समाजाचा घटक आहे, त्याबद्दलच्या आपल्या जबाबदा-या जाणीवपूर्वक पार पाडायला आपोआपच बांधिल होते. त्या समाजाची प्रगती-अधोगती त्या समाजाचीच नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी ठरते. त्यामुळे समाजातले शैक्षणिक मागासलेपण, दारिद्रय़, विषमता, अनिष्ट रूढी-परंपरा, अन्याय स्त्रियांविषयीचे प्रश्न पाहून तरुणांचे मन पेटून उठायला हवे. रक्ताची गर्मी उफाळून यायला हवी. समाजाला वर्तमान स्थितीतल्या परिस्थितीतून प्रगत भविष्याकडे घेऊन जाणे आणि आर्थिक, वैचारिक, शैक्षणिक उन्नत्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याकामी तरुणांच्या कर्तृत्वाला अनन्यसाधारण मोल प्राप्त होते. देशाला महासत्तेच्या सिंहासनावर विराजमान करण्याची धमक तरुणांच्या धमन्यांत आहे. सर्व समावेशक, उज्ज्वल, कल्याणकारी भविष्य निर्माणाची जबाबदारी तरुणांवर आहे.

मात्र, आजकालची आसपासची परिस्थिती पाहता, काळजी वाटते. नुसती काळजीच वाटून विचार थांबत नाहीत, तर भविष्याचा विचार करून अस्वस्थ व्हायला होते. तरुणांचा दिवस सुरू होतो मोबाईलवर आणि अर्धी रात्र संपल्यावर यांची रात्र संपते. सोशल मीडियावर यांचे जगणे, दिसणे, असणे भाष्य-भावनांचे प्रकटीकरण सबकुछ सोशल मीडिया! हाती काम नसेल तर चालेल, पोटात अन्न नसेल तर चालेल पण, मोबाईलमध्ये फूल चार्जिग आणि नेट रिचार्ज असला म्हणजे दुनिया मिळवली. विश्व सामावलेलं हे पिटुकलं साधन कायम हृदयाशी कवटाळून जगणं आणि हातातल्या फोडासारखं तो हातातला मोबाईल जपणं दिवसभरातले महत्त्वाचे काम असते.

या पार्श्वभूमीवर वैचारिक जाणिवेच्या पातळीवर सुजान माणसाला हा प्रश्न नक्की पडतो की, सामाजिक माध्यम, मोबाईल शाप का वरदान? दररोज टेक्नॉलॉजी बदलत आहे. चार दिवसांपूर्वी असणारे तंत्र लगेच कुचकामी ठरत आहे. आपली इच्छा असो, नसो काही बाबतीत काळाच्या बरोबर परिवर्तनाच्या दिशेने जावेच लागते. नव्याचा अंगीकार करावाच लागतो. नवनव्या साधनांच्या मदतीने साध्य काय करायचे आहे हे साधकाला निश्चित माहीत असले म्हणजे आलेल्या लाटेत वाहत जाणे अथवा न जाणे नियंत्रित करता येते.

तरुणाने दृढनिश्चियी, कणखर, मजबूत होणे अपेक्षित आहे. आजचा तरुण मात्र खूपच हळवा अतिसंवेदनशील झालेला आहे. एवढय़ा-तेवढय़ा कारणांने तरुण उदास-खिन्न होतोय. क्षुल्लक, फसव्या, खोटय़ा कारणांनीही त्याच्या भावना दुखावतात. त्याने सामाजिक माध्यमांवर अपलोड केलेल्या छबीला कोणी अंगठा दाखवला नाही, तर लगेच अवसान गळते. कपडय़ांचे, खाण्याचे इतकेच काय मृताचे, शोकाचे फोटो व्हायरल करून लाईक मिळवले की, चेह-यावर समाधानी भाव प्रकट होतात. स्वत:चे अस्तित्व असल्याचे जाणवते.

अन्यथा डिप्रेशन, एकटे पडल्याची भावना वर्तमान अस्वस्थता पसरवते. तोंडपाटीलकी फक्त स्क्रिनवर दाखवायची, सडेतोड उत्तरे, वांझोटय़ा गप्पा, बिनबुडाचे सल्ले स्क्रिनवर दाखवायचे. प्रत्यक्ष मात्र कार्यनिष्क्रियता अथवा कचखाऊपणाचे दर्शन. सोशल मीडियाच्या आयत्या रतिबाने प्रयत्नपूर्वक मेंदूची मशागत करण्याची गरज उरत नाही.

पुस्तके ढुंडाळणे, विचारवंतांना ऐकणे, विद्वानांशी प्रत्यक्ष चर्चा, जाणकारांना प्रशोत्तरे करणे यासाठी वेळ उरतो कुठे? कॉपी, पेस्ट आणि फॉरवर्डमुळे स्वअभिव्यक्ती होत नाही. कॉपी, पेस्ट, फॉरवर्ड, करून सोशल मीडियावरली सक्रियता दाखवण्याऐवजी स्वविचारांचे मंथन करून चार ओळीच का असेना, स्वत:च्या हाताने लिहून ज्ञानाची देवाणघेवाण होणे सकस सक्षम वैचारिकतेचे लक्षण नाही का?

प्रश्न विचारणे म्हणजे बुद्धीचे जिवंत असणे, जिज्ञासेला अनेक अंगाने धुमारे फुटणे. वैकासिक विचारावस्थेत लहान मुले सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात, ते याच कारणांमुळे मानवाचा विकास मरणापर्यंत सुरू असतो. शिकण्याचा प्रवास अंतापर्यंत सुरू राहायला हवा. विवेकाची सजगता कायम जागरूक असायला हवी, म्हणजे विकृत विचारांचे होणारे हल्ले वास्तवाच्या पुराव्यासह परतवता येतात. ज्यामुळे स्वत:ची आणि समाज मनाची शांती, समाधान विनाअडथळा प्रवाही राहील.

शाप की वरदान, सैतान की भगवान, हा वाद मारकतेला कारकतेकडे घेऊन जाण्यासाठी होणे गरजेचेच आहे. निसर्ग संतुलनासाठी दोन्ही असणार हे गृहीत जरी धरले तरी विघातक, दृष्प्रवृत्ती, विषैली बाजू जाणीवपूर्वक समूळ उपटून फेकून संयम आणि चिंतनाची रुजवणी करणे गरजेचे आहे. तरुणांनी स्वसामर्थ्य ओळखून, कुटुंब, समाज, देश आणि जगाप्रती असलेले आपले कर्तव्य निभावण्यातच पुरुषार्थ आहे.
थोडे नवीन जरा जुने