अधिक पारदर्शक काम करून विकासकामांमधून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे : आमदार राजळे


आगामी दोन वर्षांत नगरपरिषद, जि. प., पंचायत समिती अशा महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन लोकांपुढे जाता येईल, अशी कामे करा. पंचायत राज व्यवस्थेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी अधिक पारदर्शक काम करून विकासकामांमधून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी सुनीता गोकूळ दौंड व मनीषा रवींद्र वायकर यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या शक्तिप्रदर्शनाने झाला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे अमोल गर्जे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, महिला आघाडीच्या काशीबाई गोल्हार, तालुका संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, उपाध्यक्ष उत्तम गर्जे, गटनेते सुनील ओव्हळ, माजी सभापती विष्णुपंत अकोलकर, 'वृद्धेश्वर'चे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, ज्येष्ठ नेते उद्धव वाघ, माजी सभापती काकासाहेब शिंदे, रणजित बेळगे आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, राज्यात व जिल्हा परिषदेत वेगळ्या विचारांची सत्ता असल्याने विकास निधी मिळवण्यात खरी कसोटी लागते. पदाधिकाऱ्यांनी निधी मिळवण्यासाठी योजनांचा व कार्यपद्धतीचा अभ्यास करावा. पाठपुराव्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर देऊ. लोकांनी ज्या विश्वासाने मते दिली, त्याला तडा जाता कामा नये. या पूर्वी सोमनाथ खेडकर यांना शब्द दिला होता. त्यानुसार गेली अडीच वर्षे चंद्रकला खेडकर सभापतिपदी राहिल्या. राजळे कुटुंबाकडून कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागाविषयी दिलेला शब्द कायम पाळला जातो. हीच विश्वासार्हता कार्यकर्त्यांची ताकद म्हणून विकासकामांसाठी उपयोगी ठरते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले. आभार पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण यांनी मानले.
थोडे नवीन जरा जुने