पाडव्याला नवे सरकार येणार !


मुंबई : काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे ठाकरे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. गुढीपाडवा हे मराठी नववर्ष असून, त्या दिवशी महाराष्ट्रात नवे सरकार येईल, असा दावा भाजपचे नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

राज्यात सत्तेवर असलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे रखडलेले खातेवाटप रविवारी सकाळी जाहीर झाले असले तरी, अनेक नेत्यांची नाराजी अजून दूर झालेली नाही. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पक्षांतर्गत नाराजी असल्याची कबुली दिली आहे.

आपल्याला मनासारखे खाते मिळाले नसल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. त्यातच शनिवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा खातेवाटपापूर्वीच राजीनामा दिल्याच्या बातमीमुळेही आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली होती. याचा फायदा घेत भाजपने सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केलीय.

 या मतभेदांना चव्हाट्यावर आणून सरकारविरोधात जनमत संघटित करण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. आघाडी सरकार तयार होण्याच्या आधीपासूनच मतभेदांची मालिका सुरू झालीय. त्यामुळे एक झाला की दुसरा प्रश्न उभा राहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय घेताना चर्चेत प्रचंड वेळ जातोय. 

आदेश देऊन काम करायची सवय असलेल्या उद्धव ठाकरेंना याची सवय आता करून घ्यावी लागणार, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मुनगंटीवार म्हणाले, मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणेघेणे नाही. गुढीपाडवा हे मराठी नववर्ष असून, त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असा दावा त्यांनी केलाय. शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.
थोडे नवीन जरा जुने