देव तीळी आला । गोडे गोड जीव धाला


तुकोबाराय  म्हणतात मकरसंक्रांतीच्या दिवशी ह्या तिळात देखील नारायण आल्याने आधीच गोड असलेला तिळगुळ मग अधिकच गोड झाला आहे आणि ते खाऊन माझा जीव देखील अधिकच समाधानी झाला आहे.

 ते म्हणतात अशा ह्या निमित्ताने जणूकाही पर्वकाळच साधला गेला आहे असे वाटते. म्हणजेच ज्याप्रमाणे गंगा नदी कृष्णेला आणि गोदावरीला भेटी देण्यास जाते व तेथेच वर्षभर निवास करते व त्यामुळे त्या काळाला आपण पर्वकाळ असे म्हणतो.

देव तीळी आला । गोडे गोड जीव धाला ।।१।।
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ।।२।।
पाप पुण्य गेले । एका स्नानेंचि खुंटले ।।३।।
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ।।४।।

त्याप्रमाणेच देव देखील स्वतःहून तिळी आल्याने आणि त्याच्यातच वास करून राहिल्याने तसाच पर्वकाळ साधला गेला आहे आणि त्याच्या तशा येण्याने माझ्या मनातील अंतरीचा मळ देखील संपूर्णपणे धुवून गेला आहे. 

ते म्हणतात एवढेच नव्हे तर अशा ह्या पर्वकाळाच्या निमित्ताने त्या एका संगमात घडलेल्या स्नानाने आमच्याठायी असलेली सर्व पापपुण्येच धुऊन निघाली आहेत किंबहुना ती आता कायमचीच खुंटल्याने ती आम्हांठायी आतां पुन्हा कधीही परतणार नाहीत.

तुकोबाराय शेवटी म्हणतात अशाप्रकारे या सर्व जनामध्ये असलेला हा जनार्दन तिळी आल्याने आणि तोच तीळ माझ्या जिभेवर आल्याने माझी वाणी देखील आता संपूर्ण शुद्ध झाली आहे.
थोडे नवीन जरा जुने