जाणून घ्या ! तुमच्या आजाराचं कारण तणाव तर नाही ना...


मानवी मेंदू दीर्घकाळ तणाव सहन करू शकत नाही. निसर्गाने त्याची रचनाच तशी केलेली आहे. त्याउलट तसे झाले तर मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे माणसावर भावनिक, शारीरिक, मानसिक व व्यावहारिक पातळीवर प्रतिकूल परिणाम होतो. 

तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील अनियमितता, वेळेचा अभाव, नातेसंबंधांतील चढ-उतार आणि जास्त काम यामुळे प्रत्येक व्यक्ती तणावाला बळी पडत आहे. जाणून घेऊया तणावग्रस्त व्यक्तीला कोणती लक्षणे जाणवतात आणि कोणत्या उपायांद्वारे तो नियंत्रित केला जाऊ शकतो.

मेंदूवर परिणाम - 

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ तणावग्रस्त राहिल्यास मेंदूतील पेशी, नव्या मज्जातंतूचा विकास व मेंदूचा मध्य भाग हायपाथॅलॅमसचे नुकसान होते. अशा वेळी पीडित व्यक्ती भावनिकदृष्ट्या दुर्बल होते. तसेच स्ट्रेस हार्मोन मेंदूतील ओपियोड्स रसायनांचेही नुकसान करतो, जो व्यक्तीला निरोगी वाटण्यासाठी आवश्यक असतो.

तणावाची लक्षणे - 

दात विचकणे, मूठ आवळणे, बोलताना अडखळणे, नव्या गोष्टी शिकताना अडथळे येणे, ओठ थरथर कापणे, हातांना घाम येणे, विसरभोळेपणा, कामाचे अव्यवस्थापन, निर्णय घेण्यास अक्षमता, मनात नेहमी आत्महत्या करण्याचा विचार येणे, अधिक घाम येणे, एकटे असल्याची भावना, हातपाय थंड पडणे, तोंड सुकणे, वारंवार पाय हलवणे, जास्त थंडी वाजणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, छोट्या छोट्या गोष्टींवर कडवट प्रतिक्रिया देणे, कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास स्पष्टीकरण देणे/खोटे बोलणे, घाईघाईने बोलणे, अनिद्रा, वाईट स्वप्न पाहणे, धूम्रपान वा अल्कोहोलचे सेवन करणे अशा व्यसनांच्या नादी लागणे आणि गरज नसताना खरेदी करणे.
अंतर्गत अवयवांवर परिणाम

मेंदू व मज्जातंतू : डोकेदुखी, थकवा येणे, दु:खी वाटणे, निराश होणे, संताप, चिडचिडेपणा, विषाद, चिंता, भुकेच्या समस्या (अधिक भूक वा कमी भूक लागणे), एकाग्रता भंग होणे, दुर्बल स्मरणशक्ती.

• त्वचा : विविध प्रकारचे त्वचाविकार.

• स्नायू व सांधे : मान, खांदा व पाठीच्या स्नायूत वेदना व आकस. त्यामुळे हाडांची कार्यक्षमताही कमी होते.
• हृदय : रक्तदाब वाढणे, हृदयगती अनियमित होणे, अनावश्यक कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे आणि 
हृदयविकाराचा धोका वाढणे.

• पोट : मळमळणे, पोटदुखी, जळजळ व वजन वाढणे.
• स्वादुपिंड : मधुमेहाचा धोका.

• आतडे : अतिसार.. , मलावरोध व पचनासंबंधी इतर समस्या.

• प्रजनन संस्था : महिलांना अनियमित वा त्रासदायक मासिक पाळी, वैवाहिक जीवनाबाबत औदासीन्य, तर पुरुषांत शुक्राणूंची संख्या घटते. 

असे ठेवा नियंत्रण

सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रत्येक कामाचे नियोजन एक दिवस आधीच करा. कोणते काम आधी करावे, कधी सुरू व कधी संपवायचे, हे निश्चित करा.

१> रिलॅक्स होण्यासाठी स्ट्रेचिंग करा वा कोमट पाण्याने अंघोळ करा. कारण तणावात स्नायू आकसू लागतात.

२> तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहा. त्यामुळे स्नायू मोकळे होतील व मन:स्थिती चांगली राहील.

३> भरपूर फळे व पालेभाज्या खा.

४> तणाव आल्यास जवळच्या व जुन्या मित्रांशी व कुटुंबीयांशी चर्चा करा.

५> ध्यानधारणा, योगासने व श्वासोच्छ्वासाचा सराव मन व मेंदूतील विकार दूर करण्यासाठी फायदेशीर असतो.

६> गरज भासल्यास डॉक्टर वा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यात काहीच वावगे नाही.
थोडे नवीन जरा जुने