तुम्ही वेळेवर झोपताय का? चांगल्या झोपेसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स


अपु-या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेचे कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून आले आहे. पुरेशी झोप मिळत नसेल, तर मेंदूचे व शरीराचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही आणि त्यामुळे जीवनमानाचा दर्जा लक्षणीयरीत्या खालावतो. म्हणूनच निरोगी मेंदू आणि शरीरासाठी झोपेचे वेळापत्रक नीट सांभाळणे महत्त्वाचे आहे.
>> अपु-या झोपेचे शरीरावरील परिणाम स्मरणशक्ती : ज्या व्यक्ती एखादे काम शिकल्यानंतर/अभ्यास पाठ केल्यानंतर झोपतात, त्या परीक्षेत चांगली कामगिरी करतात. झोपेमुळे मेंदू ‘मेमरी कन्सॉलिडेशन’ किंवा माहिती पक्की करण्याच्या आपल्या गुणधर्माद्वारे नवी माहिती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतो.

>> वजन वाढणे : खूप काळ झोपेपासून वंचित राहिल्यास किंवा उशिरा झोपण्याची सवय लागल्यास वजन वाढू शकते, कारण अशा झोपेमुळे चयापचय यंत्रणा तसेच शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होतो व त्याचा परिणाम भुकेवर होतो.

>> उत्पादकतेमध्ये घट : झोपेपासून वंचित राहिल्याने आपली काम करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात कमी होते व दिवसा डुलक्या काढण्याची सवय वाढते. यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडू शकते, वैद्यकीय चुका होऊ शकतात, हवाई दुर्घटना किंवा रस्त्यावरील अपघात घडू शकतात.

>> मेंदूवरील परिणाम : अपु-या झोपेमुळे चिडचिडेपणा वाढतो आणि एकाग्रता नष्ट होते. एखादी व्यक्ती दीर्घकाळ झोपेपासून वंचित राहिल्यास तिला प्रचंड थकवा जाणवू शकतो.

>> शरीरावरील परिणाम : पुरेशी झोप न मिळाल्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो आणि किरकोळ दुखण्यांपासून ते मोठय़ा व्याधींपर्यंतच्या आजारांना दूर ठेवण्याची आपली क्षमता खालावते.
अधिक चांगल्या झोपेसाठी

>> सकाळच्या व्यायामामुळे आपल्याला अधिक ताजेतवाने वाटते व आपण दिवसभरातील कामे उत्साहाने करतो.
>> आपापल्या झोपेच्या वेळांवर लक्ष ठेवा. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल, तर तुम्ही रात्री १० वाजता झोपी जायला हवे
>> रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात १.५ ते २ तासांचे अंतर ठेवा; रात्री पचायला जड अन्न खाणे टाळायला हवे.
>> झोपेला जाता-जाता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरणे टाळा.
>> प्रौढ व्यक्तींनी किमान ७-८ तासांची झोप घ्यायला हवी.
>> दुपारच्या वेळी खूप वेळ झोपू नका.
>> झोपेची योग्य वेळ पाळता आली नाही तरीही मध्यरात्री १२ वाजल्यानंतर झोपणे लांबवू नका, त्यामुळे काही लोकांना नैराश्य येऊ शकते.
>> अपुरी आणि चुकीच्या पद्धतीची झोप ही आजच्या जीवनशैलीशी निगडित सर्वात गंभीर व्याधी आहे आणि सर्व वयोगटांतील व्यक्ती या व्याधीच्या शिकार आहेत. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रत्येकाने दर्जेदार झोप घेण्याचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे.
थोडे नवीन जरा जुने