अशा प्रकारे घ्या किडनीची काळजी..


मूत्रपिंड किंवा किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. कारण, रक्तातील टाकाऊ द्रव्ये शरीराबाहेर टाकण्याच्या आणि शरीरातील द्रवाची पातळी संतुलित ठेवण्याच्या कामी त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या छातीच्या सापळ्याच्या खाली पाठीच्या मणक्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या आपल्या किडनी दरदिवशी सुमारे १८० मि.ली. रक्ताचे शुद्धीकरण करतात व त्यातून जवळजवळ ८०० मि.ली. २ लिटर्स इतके अनावश्यक, टाकाऊ द्रव्य आणि अतिरिक्त पाणी गाळून घेतात. म्हणूनच आपला हा अवयव योग्य प्रकारे कार्यरत राहावा यासाठी त्यांचे आरोग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे.
टाकाऊ द्रव्ये आणि अतिरिक्त द्रव शरीरात साठवण्यापासून रोखण्याबरोबरच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण स्थिर राखण्याचे व तांबडय़ा पेशी तयार करणारी संप्रेरके (हार्मोन्स) तयार करण्याचे कामही किडनी करते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात किडनी निकामी होण्याचा पूर्वेतिहास आहे, अशा व्यक्तींना किडनीचा दुर्धर आजार होण्याचा धोका अधिक असतो. या अतिधोकादायक गटात न येणा-या व्यक्तींसाठीही किडनींचे आरोग्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. किडनींचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी जीवनशैलीतील हे पाच बदल उपयोगी ठरू शकतील.

शरीरातील पाण्याची पातळी जपा
भरपूर पाणी प्यायल्याने किडनींचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यास मदत होते. सरासरी ७० किलो वजनाच्या व्यक्तीला शरीरातील पाणी कमी होणे अर्थात डिहायड्रेशन टाळण्यासाठी २५०० मिली पाण्याची गरज असते. तुमची लघवी वाळक्या गवताच्या रंगाची असेल, तर त्याचा अर्थ तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे. मात्र, ती गडद पिवळी झाल्यास तुमच्या आहारात अधिक द्रवपदार्थाचा समावेश करण्याची गरज असल्याची ती सूचना असते. काही औषधांमुळेही लघवीचा रंग बदलू शकतो. आहारातील डायुरेटिक्स म्हणजे लघवीचे प्रमाण वाढायला मदत करणा-या पदार्थाचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे तुमच्या शरीरात तयार होणा-या लघवीचे प्रमाण वाढू शकते व त्या वाटे शरीरातील सोडियम आणि पाणी कमी होऊ शकते.

स्वत:ची नियमित तपासणी करून घ्या
भारतामध्ये क्रॉनिक किडनी डिसिजच्या ४०-६०% प्रकरणांमध्ये मधुमेह आणि हायपरटेन्शन किंवा अतिताण हे विकार कारणीभूत असतात, असे एका अहवालाच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. म्हणूनच, तुम्हाला या सहाय्यक विकारांपैकी कोणत्याही विकाराचा पूर्वेतिहास असेल, तर त्याची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी स्वत:ची नियमित तपासणी करून घ्या. मधुमेह किंवा अतिताण यांचे प्रमाण किती टक्क्यांवर राखणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. वर्षातून किमान दोनदा अ-१ चाचणी करून घ्या. खरेतर ही चाचणी वर्षातून चार वेळा केल्यास उत्तम. तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर तो वेळोवेळी तपासा. किडनी स्वस्थ राहण्यासाठी तो आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे.

सकस आहार घ्या!
सकस आणि संतुलित आहारामुळे तुमच्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, ज्यांच्यामुळे तुमच्या अंतर्गत अवयवांचे कार्य सुरळीत सुरू राहते आणि त्यांचे आरोग्य जपले जाते. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक एकाच प्रकारच्या अन्नातून मिळू शकत नाही, त्यामुळे एकसुरी अन्न खाणे टाळा. मोसमी ताजी फळे खा. कारण, प्रक्रिया करून टिकवलेल्या फळांहून त्यांत अधिक पोषक घटक सापडतात. व्यवस्थित आहार घ्यायला विसरू नका, पण अतिखाणेही टाळा. कारण, त्यातून लठ्ठपणा उद्भवू शकतो. नियमित व्यायामामुळेही रक्तदाब नियंत्रणास राहण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास राहण्यास मदत होते. चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम दर आठवडय़ाला केल्यास तुमची किडनी चांगल्या स्थितीत राहण्यास मदत होते.

ओव्हर द काउंटर औषधे घेणे टाळा
सरसकट जाणवणारी दुखणी, सांध्यांची सूज यांच्यासाठी औषधविक्रेत्यांकडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी पेनकीलर्स स्वत:हून घेणे टाळा. अशी औषधे वारंवार आणि दीर्घकाळासाठी घेत राहिल्यास, ती किडनीला अपाय करू शकतात.

धूम्रपानाची सवय सोडा
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते व रक्तदाबाची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब हे किडनी निकामी होण्यामागचे महत्त्वाचे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी धूम्रपानाची सवय मोडण्यासाठी उपलब्ध उपाय व उपचारांबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने