जाणून घ्या दातांच्या संदर्भात असलेले काही समज-गैरसमज.


दंतचिकित्सकांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या पातळीवर दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. दातांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी असेच काही फायदेशीर उपाय आहेत, परंतु सर्वात आधी दातांशी संबंधित भ्रम दूर करणे गरजेचे आहे. कसे ते जाणून घेऊया.

भ्रम : दातांचा पांढरा रंग म्हणजे दात अत्यंत स्वच्छ असणे.

तथ्य : जर तुमचे दात पांढरे असतील तर तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीच समस्या उद्भवणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. कॅव्हिटी (पोकळी) दातांमध्ये आणि मुळांपर्यंत निर्माण होते. त्यामुळेच सहजपणे लक्षात येणे शक्य होत नाही. कॅव्हिटी भविष्यात गंभीर समस्याचे रूपही घेऊ शकते. तसेच दातांमध्ये जमा झालेल्या कॅव्हिटीचे काळ्या रंगात रूपांतर होऊ शकते.

भ्रम : गोड खाद्यपदार्थ किंवा चॉकलेटचे सेवन केल्यानेच कॅव्हिटी निर्माण होते.

तथ्य : चॉकलेट किंवा कोणत्याही चिकट खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने दात किडण्याची शक्यता अधिक असते, परंतु गोड पदार्थ खाणेच बंद करावे हा त्याचा अर्थ होत नाही. अशा वेळी दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश करणे आवश्यक आहे.

भ्रम : दातांशी संबंधित विकार आनुवंशिक असतात.

तथ्य : दातांशी संबंधित विकार आनुवंशिक असतात, असे ज्या लोकांना वाटते ते अत्यंत चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते, दातांची संरचना आणि जॉ-लाइन (जबड्याची घडण) भलेही आनुवंशिक असू शकतात, परंतु दातांची स्थिती ती व्यक्ती दातांच्या स्वच्छतेसाठी किती सजग आणि प्रयत्नशील आहे त्यावर अवलंबून असते.

भ्रम : टार्टर काढल्यावर दातही कमकुवत होतात.

तथ्य : हिरड्या व दात मुळांच्या माध्यमातून जुळलेले असतात. अशा वेळी टार्टर (दातावर जमा झालेला पिवळा थर) आणि दातांची मजबुती यांचा एकमेकांशी कोणताच संबंध नसतो. वास्तविक हा तुमच्या कमकुवत आरोग्याचा संकेत आहे. सोबतच दातांची योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्यानेसुद्धा अशी स्थिती निर्माण होते. तज्ज्ञांच्या मते टार्टरच तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या पिवळ्या रंगासाठी जबाबदार असतो. यामुळे दातांचा नैसर्गिक रंग निघून जातो.

भ्रम : अधिक दाबाने ब्रश केल्यावर चांगली सफाई होते

तथ्य : दात निरोगी ठेवण्यासाठी अधिक दाबाने ब्रश करण्याचा धोका पत्करू नये. यामुळे दातांवर अधिक दबाव पडल्याने हिरड्या ढिल्या होतात आणि दातांची पकड कमकुवत होते. अशा स्थितीत दात पडण्याची भीतीही असते. त्यामुळे नेहमी हलक्या हातांनीच ब्रश करावा.

भ्रम : जास्त वेळ ब्रश केल्यानेच दात चांगले साफ होतात.

तथ्य : जास्त वेळ ब्रश करत राहिल्याने दातांची सफाई चांगल्या रीतीने होते, असे अनेकांना वाटते, परंतु हे चुकीचे आहे. तज्ज्ञांच्या मते, दात कधीही तीन मिनिटांपेक्षा जास्त ब्रश करू नयेत. जास्त वेळ ब्रश करत राहिल्याने दातांच्या एनॅमलचे नुकसान होते आणि दातांचा रंगही फिका पडतो.

भ्रम : ब्लीचिंग दातांसाठी धोकादायक ठरू शकते.

तथ्य : वास्तविक दातांचा रंग एकसारखा करण्यासाठी ब्लीचिंग केली जाते. डॉ. शंतनू यांच्या मते ब्लीचिंगमुळे व्यक्तीच्या मौखिक आरोग्याचे कोणतेच नुकसान होत नाही. तथापि, ब्लीचिंग केल्यानंतर अनेकांचे दात दुखायला लागतात, परंतु यामुळे कायमस्वरूपी कोणतेच नुकसान होत नाही. दातांमध्ये होणार्‍या ब्लीचिंगमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर केला जातो. यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. हा घटक दात पांढरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
थोडे नवीन जरा जुने