मानसिक आजारामुळे उद्भवणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी 'हे' नक्की वाचा


डिप्रेशन अर्थात खिन्नता. या मानसिक आजारामुळे अनेकांच्या मेंदूत वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम निर्माण होतात. या भ्रमांमुळे हे लोक या आजाराकडे कानाडोळा करतात. तसेच योग्य उपचार घेण्यातही उशीर लावतात. यामुळे रुग्णाची प्रकृती जास्त बिघडते.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, खिन्न व्यक्तीचा तणाव समुपदेशन, व्यायाम व ध्यानधारणेच्या साहाय्याने नियंत्रित करता येतो. तसेच परिस्थिती गंभीर असल्यास औषध घेण्याचा सल्लाही देण्यात येतो, परंतु अशा वेळी निराधार भ्रम उपचारात अडथळा निर्माण करतात. असेच काही भ्रम आणि त्याबाबत तथ्यांबाबत जाणून घेऊया.


भ्रम : कुणीही डिप्रेशनला बळी पडू शकत नाही.

तथ्य : मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती डिप्रेशनचे सावज होऊ शकते. तथापि, पुरुषांच्या तुलनेत डिप्रेशनची समस्या महिलांमध्ये जास्त आढळून येते. कारण महिला भावनात्मकदृष्ट्या अधिक कमकुवत असतात. तसेच एका संशोधनानुसार सध्याची जीवनशैली आणि स्पर्धेच्या युगात किशोरवयीन मुले-मुलीही डिप्रेशनचे सावज बनतात. किशोरवयीन मुलांमध्ये वाद घालणे, कुणाचेही न ऐकणे आणि जास्त रागावणे इत्यादी सवयी असतात. या सवयी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या नकारात्मक बाजू आहेत. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीला डिप्रेस्ड म्हणता येणार नाही, परंतु जर मित्रांवर राग काढणे, आवडत्या कामात रस नसणे किंवा वारंवार मन:स्थिती बिघडत असेल तर ही डिप्रेशनची लक्षणे आहेत.

भ्रम : डिप्रेस्ड लोक सहज रडतात.

तथ्य : डिप्रेशनमध्ये असे मुळीच होत नाही. जे लोक लवकर रडतात ते तणावग्रस्त आहेत आणि जे रडत नाहीत ते आनंदी आहेत, असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात की, अनेक जण आपल्या समस्या किंवा चिंता स्वत:कडेच दडवून ठेवतात. यामुळे त्यांची प्रकृती जास्तच खालावते.

भ्रम : ही समस्या आरोग्याची नाही, मग घाबरायचे का?

तथ्य : खरे तर डिप्रेशन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, परंतु दीर्घ काळ अशी परिस्थिती कायम राहिल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, डिप्रेस्ड लोकांच्या मेंदूत मज्जातंतूंपर्यंत विविध संदेश पोहोचवणारी रसायने व्यवस्थित काम करत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा रुग्णाला औषध घेण्याचा सल्लाही देण्यात येतो.

भ्रम : कष्ट केल्यास डिप्रेशनपासून बचाव होतो.

तथ्य : मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक सहापैकी एक व्यक्ती डिप्रेशनने पीडित असते. लागोपाठ कामात व्यग्र राहिल्याने डिप्रेशन दूर होण्यास फायदा होत असल्याचा अनेकांचा भ्रम असतो. तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त काम केल्याने किंवा ओव्हरटाइम केल्याने डिप्रेशन दूर होण्यापेक्षा परिस्थिती आणखी बिघडू शकते. ही शक्यता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त असते.

भ्रम : डिप्रेशनची समस्या आनुवांशिक असते.

तथ्य : मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, कुटुंबातील कुणालाही डिप्रेशनची समस्या असल्यास त्यातील इतर सदस्यांना ती होईलच असे नाही.

भ्रम : बोलल्याने डिप्रेशन आणखी वाढू शकते.

तथ्य : तज्ज्ञांच्या मते, ही अत्यंत निराधार समजूत आहे. तणाव किंवा उदासीनता असल्यास जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांसोबत चर्चा करायला हवी. त्यामुळे मनावरील ताण कमी होऊ शकतो. याउलट असे न केल्यास तणावग्रस्त व्यक्तीचा त्रास व समस्या वाढते. नकारात्मक विचार नियंत्रित करण्यासाठी आणि समस्येवर उपाय शोधण्यासाठी संबंधित व्यक्तीशी बोलणे आवश्यक ठरते. एका संशोधनानुसार आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आणि हृदयरोग वा एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यातून लवकर बरे होण्यामध्ये डिप्रेशन अडथळा आणू शकते.
थोडे नवीन जरा जुने