पुरस्काररूपी सन्मानासाठी मी संपूर्ण देशवासीयांचा ऋणी - अमिताभ बच्चन


मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्काराने माझ्या करियरला ओळख मिळाल्याचा मला अभिमान वाटत असल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. पुरस्काररूपी सन्मानासाठी मी संपूर्ण देशवासीयांचा ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत नुकताच ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमिताभ बच्चन हजर राहू शकले नाहीत. रविवारी एका विशेष सोहळ्यादरम्यान अमिताभ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 

पुरस्कारानंतर एका ब्लॉगद्वारे या सोहळ्याची छायाचित्रे त्यांनी चाह त्यांसोबत शेअर केली. पुरस्काराच्या माध्यमातून माझ्या अभिनयाला एक विशेष ओळख मिळाल्याचा अतिशय गर्व वाटत असल्याची भावना फोटोंसोबत व्यक्त केली. यासाठी भारतीय चित्रपटसृष्टी व चाहत्यांचा मला अभिमान वाटतो. 

सात दशकांच्या प्रवासात माझ्या कष्टांसोबतच चाहते, कुटुंबीयांची मिळालेली साथ ही अतिशय मोलाची आहे. यामुळेच एवढे मोठे यश संपादन करू शकलो. या पुरस्काराने विशेष स्फूर्ती मिळाली असून, भविष्यात अधिक काम करण्याचा उत्साह निर्माण झाल्याची भावनादेखील अमिताभ यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, १९६९ मध्ये 'सात हिंदुस्थानी' चित्रपटाद्वारे अमिताभ यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रवास अतुलनीय आहे. 

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी १९८४ साली त्यांना पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने