महाराष्ट्रात दर्जेदार रस्ते तयार करणार - ना. अशोकराव चव्हाणनांदेड : राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मिळालेल्या संधीतून राज्याला पुढे नेण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रात दर्जेदार रस्ते तयार करणार असल्याचे ना. अशोकराव चव्हाण यांनी येथे सांगितले.

सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी १४ फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी माजी आ. सौ.अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी झालेल्या या मुलाखतीच्यावेळी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती. रितेश देशमुख यांचे ना.चव्हाण यांचे बालपणापासून ते आजपर्यंतचे शैक्षणिक, कौटुंबीक, राजकीय, सामाजिक पेलू उलगडून दाखवले. ना. चव्हाणांचे वडील माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांना अशोकरावांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे वाटत होते.

परंतु अशोकरावांनी व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांवर कोणते करिअर करावे याबाबतचे विचार लादू नयेत. पाल्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रात करिअर करु द्यावे असे ना.चव्हाण म्हणाले. कै. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर शिक्षणासाठी आपल्या कुटुंबियांनी आमदार निवासातील दोन खोल्यामध्ये दिवस काढले. हे सांगताना ना.चव्हाण गहिवरुन आले. ना. चव्हाण व सौ.अमिता चव्हाण यांचे सुत महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात जुळले. त्यानंतर विभिन्न जातीचे असल्यामुळे या पे्रमविवाहाला घरुन मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका होती.

परंतु कै.शंकरराव चव्हाण यांनी या विवाहाला मान्यता दिली. परंतु प्रेमविवाह करण्याबरोबर तो निभावून नेण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे ना. चव्हाणांनी सांगितले. शालेय जीवनात आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहोत हे सांगितले नव्हते. परंतु वृत्तपत्रातून आलेल्या जाहिरातीमुळे ही बाब सर्वांना माहित झाली, असा उलगडा ना. चव्हाणांनी केला. राज्याचा माजी मुख्यमंत्री असताना आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते केले. आता सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री म्हणून संधी मिळाल्याने राज्याला पुढे नेण्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामधील रस्त्याच्या धर्तीवर राज्यात दर्जेदार रस्ते तयार करण्याचा संकल्प ना.चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षणाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे व राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने