ताण दूर करण्यासाठी हे करा आणि चमत्कार पहा
जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आजच्या तरुण पिढीने अवलंबलेली धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, ताण दूर करण्यासाठी धूम्रपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणा-या जंकफूड खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत.
पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. तरुण वयात चोरपावलांनी शरीरात प्रवेश झाल्यामुळे हृदयविकारांमध्ये वाढ झाली आहे.

रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक.  ‘‘छातीत धडधड होणे, सततची डोकेदुखी, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायाला बधीरता येणे व चक्कर येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत.

परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही व लक्षात येते तेव्हा मूत्रिपड, डोळे व हृदय या नाजूक इंद्रियांवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते.

त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला पंप करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतात. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते. अवघ्या वीस वर्षाच्या मुलालासुद्धा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने कालांतराने याचे रूपांतर हृदयविकारात होत आहे.’’

आजची नवीन पिढी तर पूर्णत: डिजिटल मानसिकतेत वाढते आहे. आभासी दुनियेच्या या जगात स्थिर होऊ पाहणा-या आजच्या युवा पिढीमध्ये ‘सहनशीलता’ फारच अभावाने आढळून येत आहे.

तरुण पिढीमध्ये वाढत असलेल्या उच्च रक्तदाबाविषयी नेरूळ, नवी मुंबई येथील तेरणा सह्याद्री हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजेया मुंढेकर म्हणाले, ‘‘इंटरनेटवरील वेबसाईट्स, गुगलसारखी शोधयंत्रे, फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब अशी सर्व बाजूंनी माहितीचा पाऊस पाडणारी सोशल मीडिया आता घडलेली घटना व्हीडिओ शूट करून क्षणार्धात जगभर पोहोचवणारे व्हॉट्सअ‍ॅप अशा एक ना अनेक गोष्टी आजच्या तरुण पिढीसमोर हात जोडून उभ्या असल्याने आजचा युवा वर्ग हा जग जिंकल्याच्या अविर्भावात वावरत असतो व अशा वेळी शालेय अथवा महाविद्यालयीन आयुष्यात येणारे अपयश किंवा करिअर /व्यवसायात आलेला चढ-उतार सहजासहजी सहन करण्याची वृती फार कमी झाली असून मानसिक तणावाचे प्रमाण भयंकर वाढीस लागल्यामुळे पंचविशीतली तरुण पिढी उच्च रक्तदाबाला बळी पडत आहे.’’

याचबरोबर अधिक पैसे कमवण्याच्या हव्यासातून आज अनेक तरुण-तरुणी कॉल सेंटरचा पर्याय निवडतात; परंतु या कामांमुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलत असल्याने त्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असून उच्च रक्तदाबाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे, असे मत डॉ. अजेया मुंढेकर यांनी व्यक्त केले. २०२० सालापर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ३० कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ने नुकतीच जाहीर केली आहे.


थोडे नवीन जरा जुने