बुद्धीच्या बळावर प्रत्येक गोष्टीवर मात करता येते !


शरीराला असणारं एखादं व्यंग मानसिक ताणाचे कारण बनू शकते. जन्मताच एखाद्याला शारीरिक व्यंग असणं किंवा अपघाताने एखादा अवयव निकामी होणं याचा परिणाम मानसिक खच्चीकरणावर होऊ शकतो. सौंदर्य किंवा कुरूपतेमुळेही होणारं मानसिक खच्चीकरण, समाजात वावरताना मिळणारी हीन वागणूक, चिडवणे, डिवचण्यासारखे प्रकार हे मानसिक ताण-तणावाचे कारण बनू शकतात.

आपल्या शरीराचा एखादा अवयव निकामी असणं म्हणजे, आपण दुर्दैवी आहोत, आपण जगण्याच्या लायक नाही, असे समज करून घेऊन ही मंडळी निराशेच्या गर्तेत सापडतात. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जीवनाचा अर्थ उलगडू शकतो.

अगदी बारीक-सारीक गोष्टींनी मनाने खचून जाणारी माणसे आपल्या अवतीभवती वावरत असतात. आपण शरीराने अधू झालो म्हणजे मित्र परिवार आपल्यापासून दूर जाईल ही भीतीही त्यांना सतावणारी ठरते, मात्र तुमच्या स्वभावाने त्यावर मात केली जाऊ शकते.

रंग : काळा रंग असणे हा देखील काहीजणांसाठी तणावाचा विषय बनून जातो. काळय़ा रंगामुळे सौंदर्यात बाधा येते असे समजून आपण खूपच वाईट आहोत, असा समज करून समाजात वावरताना या व्यक्ती स्वत:ला कमी लेखतात. घर, समाजात वावरतानाही त्यांच्या मनात रंगाची अढी दिसून येते. मात्र बुद्धी सतेज असेल तर समाजात वावरताना, नोकरी- व्यवसायात स्थिरता अनुभवण्याकरिता बुद्धीच्या बळावर ताणतणावावर मात केली जाऊ शकते.

चिकटलेली बोटे : सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या हाता-पायांना पाच पाच बोटे असतात. मात्र अपवादात्मक काहींच्या हाता-पायांना सहा बोटे दिसून येतात. यावेळी आपण इतरांपेक्षा असे वेगळे म्हणून समाजात वावरताना हात-पाय लपवून वावरण्याकडे त्यांच्या कल दिसून येतो.

अपवादात्मक काहीजणांच्या हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली असतात. यावेळी अंगठा तसेच बाकी बोटेही एकत्रित असतात. मात्र हे जन्मताच असल्याने आपण काही करू शकत नाही, असा समज करून ते त्याच विचारात गुरफटून राहतात. मूल लहान असेल तोपर्यंत ठीक पण नंतर मोठं झाल्यावर लोक काय म्हणतील, याचा विचार करून केवळ नशिबाला दोष दिला जातो. यावर उपाय म्हणून शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. या सगळय़ाचे न्यून बाळगून समाजात वावरणे, स्वत:ला कमी लेखणे यातून आयुष्यभरासाठी मनाला टोचणी लागून राहते. यासाठी जीवनातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यातून स्वत:ला वेळीच बाहेर काढणे गरजेचे असते.

गतिमंद मूल : आपलं मूल गतिमंद असेल, तर जीवनात एकप्रकारे उदासीनता निर्माण होते. आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं आहे, ते इतरांप्रमाणे वागू शकत नाही, त्याच्या भविष्याची चिंता पालकांना सतावणारी ठरते. त्या मुलांकडे सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र ती मुलं शिकू शकत नाहीत किंवा काही अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत, असा समज करून घेणे चुकीचे आहे. स्पेशल स्कूलच्या माध्यमातून अशा मुलांना पुढे आणणे, आपण त्यांच्यासमोर दु:खी, चिंताग्रस्त न राहता त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, त्यांना वेळेवर औषधोपचार करणे, स्कूलमधील अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रवृत्त करणे आदी गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांना समाजात कुणी हिणवले तर, त्या मुलांची कुणी टिंगल केली तर आदी गोष्टी मनातून काढून टाकून सकारात्मक दृष्टीने त्यांना पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केल्यास भविष्यात या मुलांनाही जगण्याचा आनंद मिळू शकतो.

बोबडेपणा 
: आपलं मूल लहानपणी बोबडं बोलतं तोवर ठीक आहे, मात्र विशिष्ट वयानंतरही ते बोबडं बोलू लागलं, तर तो त्या मुलाच्या चेष्टेचा विषय बनून जातो किंवा इतर मुलंही त्याची खिल्ली उडवताना दिसतात, चिडवाचिडवी सुरू होते. यामुळे मुले मानसिक त्रासालाही सामोरे जाण्याचीही शक्यता असते. कधी कधी मूल लहानपणी लवकर बोलावं म्हणूनही अनेक उपाय केले जातात. जेव्हा मूल बोलू लागतं तेव्हा ठरावीक वयापर्यंत त्याचा बोबडेपणा ठीक वाटतो. पालकांनीही त्याच्यासोबत बोबडे बोल बोलायला सुरू केले, तर ते मूलही बोबडे बोल बोलू लागतं. लहान मुलांचे दात लवकर खराब होणे, लवकर पडणे याचाही परिणाम त्याच्या उच्चारांवर होताना दिसून येतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या बोलण्याबरोबरच, दातांची काळजी घेणेही जास्त जरुरीचे ठरू शकते. यामुळे पुढे उद्भवणा-या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात.

माणसात शारीरिक व्यंग असलं, तर त्याचा कमीपणा बाळगून समाजात कसं वावरावं ही मनात अढी ठेवून राहिलं, तर विकास होणं कठीण ठरू शकतं. बुद्धीच्या बळावर शारीरिक व्यंगावर निश्चितच मात केली जाऊ शकते.

Everything can be overcome with the force of wisdom
थोडे नवीन जरा जुने